
मुंबई, 05 जुलै (हिं.स.) - कुर्ला (पश्चिम) येथील नौपाडा परिसरात आज (दिनांक ५ जुलै २०२६) दुपारी एका दुकानावर अचानक झाडाची फांदी कोसळली. या दुर्दैवी घटनेत स्थानिक नागरिक युनूस कुंडावाला (वय ६३ वर्षे) यांचा मृत्यू ओढवला. या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि सविस्तर आढावा घेतला. तसेच, मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची तत्काळ आर्थिक मदत महापौर श्रीमती तावडे यांनी जाहीर केली.
यादरम्यान, महापौरांनी स्थानिक नागरिकांच्या भावना आणि तक्रारी समजून घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कुर्ला आणि परिसरासह मुंबईतील झाडांचे तत्काळ सर्वेक्षण (Tree Audit) करून आवश्यक तिथे झाडांच्या छाटणीची कारवाई युद्धपातळीवर करण्याचे सक्त निर्देश महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, अशी ग्वाही महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिली.
या पाहणीप्रसंगी महापौरांसोबत स्थानिक नगरसेवक तथा सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री. हरीश भांदिर्गे, नगरसेवक श्री. नितेश सिंह तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि स्थानिक पोलीस उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी