लातूर - मुरुडच्या विकासाचा 'मास्टर प्लॅन' जिल्हा परिषदेत मिनी क्रिकेट स्टेडियम, व्यापारी संकुल, आधुनिक शाळा
७ जुलैच्या सभेत बी.ओ.टी. तत्त्वावरील महत्त्वाच्या ठरावावर होणार निर्णय लातूर, 05 जुलै (हिं.स.)। मुरुडच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि शिक्षण, क्रीडा तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेला महत्त्वाकांक्षी प्रस्ताव आता जिल
मुरुड चा विकास


७ जुलैच्या सभेत बी.ओ.टी. तत्त्वावरील महत्त्वाच्या ठरावावर होणार निर्णय

लातूर, 05 जुलै (हिं.स.)।

मुरुडच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि शिक्षण, क्रीडा तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेला महत्त्वाकांक्षी प्रस्ताव आता जिल्हा परिषदेच्या निर्णयाच्या उंबरठ्यावर आला आहे. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या तब्बल १ लाख ४ हजार ९७५ चौरस फूट जागेवर बी.ओ.टी. (बांधा वापरा हस्तांतरित करा) तत्त्वावर ग्रामीण मिनी क्रिकेट स्टेडियम, व्यापारी संकुल, आधुनिक शाळा इमारत, खेळाडूंसाठी चेंजिंग रूम व वस्तीगृह उभारण्याचा ठराव ७ जुलै रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मुरुड हे लातूर जिल्ह्यातील वेगाने विकसित होणारे व्यापारी, शैक्षणिक आणि सामाजिक केंद्र मानले जाते. सुमारे ६० ते ७० हजार लोकसंख्येच्या या परिसरात युवकांसाठी उपलब्ध असलेले हे प्रमुख क्रीडांगण आधुनिक सुविधांनी सज्ज करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आता त्या मागणीला प्रत्यक्ष आराखड्याचे स्वरूप मिळाले आहे. प्रस्तावानुसार मैदानावर प्रेक्षक गॅलरीयुक्त स्वर्गीय अजित (दादा) पवार ग्रामीण मिनी क्रिकेट स्टेडियम, तर मुख्य रस्त्यालगत स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव (काकासाहेब) नाडे व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर शाळेसाठी अत्याधुनिक बहुमजली इमारत, खेळाडूंसाठी चेंजिंग रूम, वस्तीगृह आणि आवश्यक मूलभूत सुविधा उभारण्याचाही समावेश आहे. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शाळेच्या मालमत्तेतूनच शाळेसाठी कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे. व्यापारी संकुलातून मिळणाऱ्या महसुलातून शाळेचा विकास, देखभाल, शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक उपक्रम राबविण्याचा उद्देश आहे. त्यामुळे ही योजना केवळ बांधकामाची नसून शैक्षणिक स्वावलंबनाचा नवा नमुना ठरू शकते. प्रकल्पाची अंमलबजावणी बी.ओ.टी. तत्त्वावर स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि कै. पद्मश्री आप्पासाहेब पवार प्रतिष्ठान, मुरुड यांच्या सहकानि करण्याचा प्रस्ताव आहे. प्रारंभी खासगी गुंतवणुकीतून प्रकल्प उभारून ठरावीक कालावधीनंतर तो जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. प्रस्तावात शाळेच्या निझामकालीन ऐतिहासिक इमारतीचे संवर्धन, मैदानाचा सार्वजनिक वापर कायम ठेवणे आणि विकासाबरोबर पर्यावरणीय समतोल राखण्यालाही प्राधान्य देण्यात आले आहे. या प्रस्तावाला जिल्हा परिषद सदस्य सौ. जयश्री तवले, पंचायत समिती सदस्य श्री. पंकज गायकवाड, ग्रामपंचायत प्रतिनिधी श्री. अक्षय चव्हाण यांच्या सहस्थानी पदाधिकारी व नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande