
अमरावती, 05 जुलै (हिं.स.)अमरावती महानगरपालिकेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विकासकामांसाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत अनेक प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असून, मनपा आयुक्त वर्षा लढा यांच्या कार्यपद्धतीबाबत वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.
महापालिका क्षेत्रातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत अनेक प्रस्तावांना मंजुरी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांसमोरील मूलभूत समस्या कायम असून, विकासकामे रखडल्याचा फटका थेट नागरिकांना बसत आहे. अनेकवेळा महापौर तेजवानी, पक्षनेता चेतन गावंडे, विरोधी पक्ष नेता विलास इंगोले व सभापतीं अविनाश मार्डीकर यांनी आयुक्तांसोबत या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. या विषयावरून महापौर, व आयुक्त यांच्यात खटके उडून शाब्दिक वादही झाला.
याशिवाय, प्रत्येक विकासकामाच्या फाईलमध्ये विविध त्रुटी काढून त्या प्रलंबित ठेवल्या जात असल्याने निर्णय प्रक्रियेला विलंब होत असल्याची तक्रारही लोकप्रतिनिधींनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन आयुक्तांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. पालकमंत्र्यांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, नगरसेवक संजय गव्हाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर या वादाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे. गव्हाळे यांनी पत्र परिषद घेऊन हा गुन्हा आकसापोटी दाखल करण्यात आल्याचा आरोप केला. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय अशा प्रकारची कारवाई होणे शक्य नसते. त्यामुळे गव्हाळे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यामागे नेमके कोणाचे पाठबळ होते, तसेच संबंधित डॉ. जाधव यांनी कोणाच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. या सर्व घडामोडींमुळे अमरावती महानगरपालिकेत प्रशासन विरुद्ध पदाधिकारी असा संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकीकडे अधिकारी, पदाधिकारी यांच्यात वाद तर दुसरीकडे मनपा आयुक्त वर्षा लढा यांच्या संभाव्य बदलीचीही चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावसाळी अधिवेशनानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन बदली संदर्भात आवश्यक प्रशासकीय निर्णय घेतले जातील, असे संकेत दिल्याची माहिती आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताही अधिकृत आदेश जारी झालेला नाही. यासंदर्भात मनपा आयुक्तांशी संपर्क साधला असता त्यांनी पारिवारिक कार्यक्रमात असल्याचे सांगितले. त्यामुळे बदली संदर्भात मला कुठलीही माहिती नसल्याचे ही त्या म्हणाल्या..
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी