
अमरावती, 05 जुलै (हिं.स.) अंजनगावबारी परिसरात ६ मे २०२६ रोजी झालेल्या वादळी वारे, मुसळधार पाऊस व गारपिटीमुळे केळीसह कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या नुकसानाचे महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे पूर्ण होऊन दोन महिने उलटले, तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. केळी उत्पादक शेतकरी निखिल श्रीकृष्ण भोपळे यांच्या दोन एकरांतील सुमारे १, ८०० केळीची झाडे वादळामुळे जमीनदोस्त झाली. या नुकसानीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पुढील हंगामासाठी पुन्हा लागवड करणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
दुसरीकडे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. प्रलंबित ठिबक सिंचन अनुदान, पीककर्जाचा वाढता बोजा, वाढलेला उत्पादन खर्च आणि नुकसानभरपाईतील विलंब यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शासनाने तातडीने नुकसानभरपाईसह प्रलंबित अनुदान वितरित करून विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
--------------------------------------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी