
मुंबई, 05 जुलै (हिं.स.)। बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आज (५ जुलै) गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत विवाहबंधनात अडकत आहे. मुंबईतील राहत्या घरी विशेष विवाह कायद्याअंतर्गत हा विवाहसोहळा पार पडत असून या खास सोहळ्यासाठी कुटुंबीय, जवळचे मित्र आणि काही निवडक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. भर पावसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज जे ठाकरे आमिरच्या घरी पोहोचल्याचा फोटो समोर आला असून त्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे आणि आमिर खान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यापूर्वी ईदच्या निमित्ताने राज ठाकरे आपल्या कुटुंबासह आमिरच्या घरी गेले होते. त्या भेटीनंतर त्यांना निरोप देण्यासाठी आमिर अनवाणी घराबाहेर आल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तसेच चित्रपटांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आमिर अनेकदा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेल्याचेही पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणी आमिरने राज ठाकरे यांना खास निमंत्रण दिल्याचे बोलले जात आहे.
या विवाहसोहळ्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी, ‘लगान’ चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री एली अवराम, आमिरचा मुलगा जुनैद खान आणि मुलगी आयरा खान यांच्यासह अनेक जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित राहिले आहेत. अत्यंत साध्या आणि खासगी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडत आहे.
आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांची पहिली भेट सुमारे २५ वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर २०२४ मध्ये आमिरच्या चुलत बहिणी नुझात खानच्या माध्यमातून बंगळुरूमध्ये दोघांचा पुन्हा संपर्क आला. त्यानंतर मैत्री वाढत गेली आणि त्याचे प्रेमात रूपांतर झाले. जवळपास वर्षभर दोघे लाँग-डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. मार्च २०२५ मध्ये आमिरने आपल्या साठाव्या वाढदिवसानिमित्त गौरीची माध्यमांसमोर जीवनसाथी म्हणून ओळख करून दिली होती.
लग्नापूर्वीच गौरी आपल्या मुलासह बंगळुरूहून मुंबईत स्थायिक झाली होती. पूर्वी एका हेअरकेअर ब्रँडमध्ये काम करणारी गौरी आता ‘आमिर खान प्रॉडक्शन्स’च्या कामकाजात आमिरला सहकार्य करत आहे. गेल्या वर्षभरापासून दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्या लग्नाच्या चर्चांना गेल्या महिन्यापासून जोर आला होता. अखेर आज विशेष विवाह कायद्याअंतर्गत दोघे विवाहबंधनात अडकत असून आमिरच्या आयुष्यातील नव्या पर्वाची अधिकृत सुरुवात होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule