
वॉशिंग्टन, 05 जुलै (हिं.स.)फिफा विश्वचषकात फ्रान्सने पॅराग्वेला १-० ने पराभूत करत अंतिम आठ संघांमध्ये प्रवेश केला. सामन्याचा निकाल जरी माफक असला तरी, सामना मात्र अत्यंत चुरशीचा झाला होता. फ्रान्सचा कर्णधार किलियन एमबाप्पेने पॅराग्वेविरुद्धच्या या कष्टाने मिळवलेल्या विजयाचे वर्णन सोशल मीडियावर एका साध्या संदेशाद्वारे केले. त्याने 'एक्स'वर सामन्यातील काही छायाचित्रांसह कामाचा एक दिवस अशी पोस्ट केली. लिंकन फायनान्शियल फील्डवर झालेल्या या सामन्यात एमबाप्पे फ्रान्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने दुसऱ्या हाफमध्ये पेनल्टीवर गोल करत फ्रान्सला १-० असा विजय मिळवून दिला. स्पर्धेतील फ्रान्सची ही आतापर्यंतची सर्वात कठीण परीक्षा ठरली.
या विजयामुळे फ्रान्सची उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोशी गाठ पडणार आहे. दिदिएर देशॅम्प्स यांचा संघ आता तिसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. गट फेरी सहज पार केल्यानंतर, फ्रान्सला पॅराग्वेच्या शिस्तबद्ध संघाविरुद्ध प्रत्येक संधीसाठी खूप संघर्ष करावा लागला. याच पॅराग्वे संघाने मागील फेरीत जर्मनीला धक्का दिला होता.
पहिल्या हाफच्या मध्यात तणावही निर्माण झाला होता. आंद्रेस कुबासने केलेल्या आव्हानावर एमबाप्पेने प्रतिक्रिया दिल्याने दोन्ही संघांच्या फुचबॉलपटूंमध्ये बाचाबाची झाली. ब्रेकनंतर फ्रान्सने अधिक आक्रमक पवित्रा घेतला; मिडफील्डर मनू कोनेने लांबून मारलेला फटका पॅराग्वेचा गोलकीपर ऑर्लँडो गिलने उत्कृष्टरीत्या अडवला.सामन्यातील निर्णायक क्षण ६६ व्या मिनिटाला आला. बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या डेझायर डोएने त्वरित प्रभाव पाडला. त्याने तीन बचावपटूंना चकवून ड्रिबलिंग केले आणि त्यानंतर डिएगो गोमेझने त्याला पेनल्टी एरियामध्ये पाडले.
सामना पुन्हा सुरू करण्यास पॅराग्वेने विलंब करण्याचा प्रयत्न केला, तरीही एमबाप्पेने संयम राखला आणि मिळालेल्या पेनल्टीवर शांतपणे गोलच्या कोपऱ्यात चेंडू मारून संघाचे खाते उघडले. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात बरोबरी साधण्यासाठी पॅराग्वेने आक्रमक पवित्रा घेत अधिक फुटबॉलपटूंना पुढे पाठवले, पण फ्रान्सने आपली निसटती आघाडी टिकवून ठेवण्यासाठी सामन्याचे प्रभावीपणे नियंत्रण केले.
स्टॉपेज टाइमच्या अखेरच्या क्षणी एम्बाप्पेने आघाडी जवळजवळ दुप्पट केली होती, पण गिलने उत्कृष्ट दुहेरी बचाव करत ते रोखले. फ्रान्सच्या या निसटत्या विजयामुळे, स्पर्धेतील सर्वात कठीण आव्हानावर मात करून ते अंतिम आठ संघांमध्ये पोहोचले आहेत. एम्बाप्पेच्या कामाचा दिवस या संयमित पोस्टमधून, दोन वेळच्या विश्वविजेत्यांनी एका तणावपूर्ण नॉकआउट लढतीला ज्या व्यावसायिक वृत्तीने हाताळले, ते दिसून येते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे