मोरोक्को सलग दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणारा पहिला आफ्रिकन देश
टेक्सास (अमेरिका), 05 जुलै (हिं.स.) मोरोक्कोने फिफा विश्वचषक २०२६ च्या १६ संघांच्या फेरीत सह-यजमान कॅनडाला ३-० ने पराभूत करून सलग दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. स्टार मिडफिल्डर अझेडिन ओनाहीने दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल केले, तर सौफियान रह
मोरोक्कोचा फुटबॉल संघ


टेक्सास (अमेरिका), 05 जुलै (हिं.स.) मोरोक्कोने फिफा विश्वचषक २०२६ च्या १६ संघांच्या फेरीत सह-यजमान कॅनडाला ३-० ने पराभूत करून सलग दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. स्टार मिडफिल्डर अझेडिन ओनाहीने दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल केले, तर सौफियान रहिमीने इंज्युरी टाइममध्ये गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केले.

कॅनडाने सामन्याच्या सुरुवातीला उत्कृष्ट खेळ केला, सतत आक्रमण करत मोरोक्कोच्या बचावावर दबाव टाकला. सामन्यातील पहिली मोठी संधी कॅनडाला मिळाली, जेव्हा अली अहमदच्या पासवर टानी ओलुवासेयीने हेडरद्वारे गोल केला. पण, मोरोक्कोचा कॅनेडियन वंशाचा गोलकीपर यासिन बोनूने उत्कृष्ट बचाव करत आपल्या संघाला सुरुवातीच्या धक्क्यापासून वाचवले. पहिल्या हाफमध्ये मोरोक्कोला मोठा धक्का बसला. या स्पर्धेतील त्यांचा आघाडीचा फुटबॉलपटू इस्माईल शबारीला, २२ व्या मिनिटाला स्नायूच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी सौफियान रहिमी बदली फुटबॉलपटू म्हणून मैदानात उतरला.

मध्यंतरानंतर, मोरोक्कोने सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले. ५० व्या मिनिटाला, अश्रफ हकिमीच्या एका अप्रतिम सेट-पीस पासवर, अझेडिन ओनाहीने बॉक्सच्या बाहेरून अचूक वेळेवर शॉट मारून मोरोक्कोला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे मोरोक्कोचा आत्मविश्वास वाढला, तर कॅनेडियन संघ दबावाखाली आला. ८२ व्या मिनिटाला, एका वेगवान प्रति-हल्ल्यादरम्यान, ब्राहिम डियाझच्या पासवर ओनाहीने आपला दुसरा गोल करून स्कोअर २-० असा केला.

अतिरिक्त वेळेत, ब्राहिम डियाझच्या एका अप्रतिम थ्रू पासवर सौफियान रहिमीने गोल करून मोरोक्कोचा ३-० असा दणदणीत विजय निश्चित केला. रहिमीने यापूर्वी हेडरने क्रॉसबारला चेंडू मारला होता, पण अखेरीस त्याने गोल नोंदवला. या विजयामुळे मोरोक्कोने सलग दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच, विश्वचषकाच्या इतिहासात एकापेक्षा जास्त वेळा अंतिम आठ संघांमध्ये पोहोचणारा तो पहिला आफ्रिकन देश ठरला. दरम्यान, कॅनडाची विश्वचषक मोहीम १६ संघांच्या फेरीतच संपुष्टात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande