
नांदेड, 05 जुलै (हिं.स.)। नागपूरच्या इमामवाडा डेपोतून 'शिवाई' ही इलेक्ट्रिक बस चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर एसटी महामंडळ सतर्क झाले असून बस स्थानकावरही सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नागपूर आणि नांदेडमध्ये बस चोरणारा आरोपी एकच असल्याची माहिती समोर आली आहे.
नांदेड मध्यवर्ती बसस्थानकातूनही एसटी बस चोरून नेण्याचा प्रयत्न झाला होता. सुदैवाने वेळीच सतर्क झालेल्या कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. तांत्रिक तपासणी आणि माहितीनुसार दोन्ही घटनांमधील आरोपी विष्णू गणपती निलावार (वय २३, रा. तेलंगणा) हा एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे. नांदेडमध्ये चोरण्याचा प्रयत्न झालेली बस क्रमांक (एमएच-१४-एमएच-१३८०) ही आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे हा आरोपी पुन्हा कसा मोकाट सुटला आणि तो सातत्याने एसटी बसेसनाच लक्ष्य का करत आहे. याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis