


रायगड, 05 जुलै (हिं.स.)। : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी रायगडसह नवी मुंबई परिसरातील भूमिपुत्रांनी आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. या मागणीसाठी ८ जुलै रोजी मुंबईतील विधानभवनावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सकाळी १० वाजता पनवेलमधील चिंचपाडा येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. हा मोर्चा कळंबोली, सानपाडा, चेंबूर आणि पूर्व द्रुतगती महामार्ग मार्गे विधानभवनावर धडकणार आहे.
जासई येथील दिबा पाटील मंगल कार्यालयात रविवारी आयोजित तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. आंदोलन सर्वपक्षीय स्वरूपात असले तरी ते 'दिबा प्रेमी नामकरण समिती' च्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
दरम्यान, विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी तरुणी रश्मिता पोपेटा यांनी २४ जूनपासून पनवेलमधील चिंचपाडा येथे आमरण उपोषण सुरू केले होते. सलग अकरा दिवस उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. किडनीवरील परिणाम, शरीरातील किटोनचे वाढलेले प्रमाण यामुळे त्यांना पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. आमदार रोहित पवार यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी उपोषण मागे घेतले असले, तरी विमानतळाच्या नामांतरासाठीचा लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, अकरा दिवस उपोषण सुरू असतानाही राज्य सरकारकडून कोणताही मंत्री किंवा अधिकृत प्रतिनिधी चर्चेसाठी पुढे आला नाही. त्यामुळे भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सोमवारी उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, दिबा पाटील यांच्या नावासाठी त्यांनी लोकसभेत दोन वेळा प्रश्न उपस्थित केला आहे. राज्य सरकारने नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून गृह विभागाचा आवश्यक अहवालही सादर करण्यात आला आहे. विमानतळाच्या नामकरणाचा अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ घेणार असून, सरकारकडून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दिबा पाटील यांच्या नावाशिवाय अन्य कोणताही नामकरणाचा प्रस्ताव नसल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
दिबा पाटील यांनी नवी मुंबईच्या उभारणीत तसेच शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भूमिपुत्र संघटना आणि विविध सामाजिक संघटनांनी पुन्हा एकदा ठामपणे केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)