
सोलापूर, 05 जुलै (हिं.स.)।
आषाढी यात्रा आणि पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच गंभीर रुग्णांसाठी एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय पालखी मार्गावरील गर्दीच्या ठिकाणी तातडीची आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी २१५ मोटारसायकल ॲम्ब्युलन्स कार्यरत राहणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयात आषाढी वारी आणि यात्रेच्या तयारीसंदर्भात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार समाधान अवताडे, आमदार राजीव खरे, आमदार अभिजीत पाटील आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले, पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या आणि आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे. 'भक्ती विठ्ठलाची – सेवा आरोग्याची' हे ब्रीदवाक्य समोर ठेवून आरोग्य विभागाने पूर्ण क्षमतेने सेवा द्यावी.पालखी मार्गावरील गर्दीमुळे चारचाकी ॲम्ब्युलन्स पोहोचू शकत नसलेल्या ठिकाणी २१५ मोटारसायकल ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून प्रशिक्षित आरोग्यदूत थेट वारकऱ्यांपर्यंत पोहोचून प्राथमिक उपचार आणि आवश्यक आरोग्य सेवा देणार आहेत. गंभीर रुग्णांना तातडीने उच्चस्तरीय उपचारासाठी एअर ॲम्ब्युलन्सची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.याशिवाय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात २४ तास कार्यरत आयसीयू कक्ष सुरू ठेवण्यात येणार असून, वारीदरम्यान वारकऱ्यांना तातडीची आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केल्याची माहितीही मंत्री आबिटकर यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड