
पुणे, 05 जुलै, (हिं.स.)। आळंदी ते पंढरपूर या संतांच्या पालखी मार्गावर २२५ किलोमीटर धावण्याचा अनोखा उपक्रम ‘शक्ती रन’ यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या उपक्रमात सहभागी झालेल्या १९ धावपटूंपैकी १६ जणांनी सलग तीन दिवस धावत शनिवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचून श्री पांडुरंगाचे दर्शन घेतले.निगडी येथील धावपटू भूषण तारक गेल्या पाच वर्षांपासून पालखी मार्गावर ‘रन वारी’ हा उपक्रम राबवत आहेत. यंदा प्रथमच त्यांनी अधिक व्यापक स्वरूप देत २२५ किलोमीटरसाठी ‘शक्ती रन’, १०० किलोमीटरसाठी ‘भक्ती रन’ आणि ५० किलोमीटरसाठी ‘श्रद्धा रन’ असे तीन वेगवेगळे टप्पे आयोजित केले. या उपक्रमाला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.‘शक्ती रन’साठी १९ जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ धावपटूंनी संपूर्ण २२५ किलोमीटरचे अंतर निश्चित वेळेत पूर्ण करत उपक्रम यशस्वी केला. या धावण्याची सुरुवात गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरापासून झाली.उपक्रमाचा पहिला टप्पा आळंदी ते तरड असा १०० किलोमीटरचा होता. दुसरा टप्पा तरड ते माळशिरस असा ७७ किलोमीटरचा असून त्याला दुसऱ्या दिवशी पहाटे प्रारंभ झाला. तिसरा आणि अंतिम टप्पा माळशिरस ते पंढरपूर असा ५६ किलोमीटरचा होता. या टप्प्यालाही पहाटे साडेपाच वाजता सुरुवात झाली.उपक्रमातील ११ धावपटूंनी दुपारी दोनपूर्वीच पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर परिसर गाठला. तिन्ही टप्प्यांतील अंतर आयोजकांनी निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे बंधन धावपटूंवर होते. शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि वारकरी परंपरेप्रती असलेली श्रद्धा यांचा संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला.वारीच्या आध्यात्मिक वातावरणात धावण्याचा हा अनोखा प्रयोग भाविकांसह नागरिकांचेही लक्ष वेधून घेत असून, ‘रन वारी’ उपक्रमाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु