
सोलापूर, 05 जुलै (हिं.स.)।
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुशल जैन यांच्या संभाव्य बदलीबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर विराम मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात झालेल्या समन्वय बैठकीनंतर कामकाजाला गती देण्याबाबत सकारात्मक सहमती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेतील काही सदस्य आणि पदाधिकाऱ्यांकडून सीईओंच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या बदलीची चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली होती.सुमारे तीन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत रुजू झालेल्या कुशल जैन यांच्याकडे मोठ्या प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी आहे. जिल्हा परिषदेचा व्यापक कारभार लक्षात घेता निर्णय प्रक्रियेला अपेक्षित वेग मिळत नसल्याची भावना काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.दरम्यान, शुक्रवारी या विषयावरील वृत्ते प्रसिद्ध झाल्यानंतर सीईओ कुशल जैन, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्यात सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत प्रशासनाकडून विकासकामे आणि प्रलंबित प्रस्तावांवर अधिक वेगाने निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.त्यानंतर पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनासोबत समन्वयाने काम करण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. कामकाज वेळेत आणि परिणामकारक पद्धतीने होत राहिल्यास सीईओंच्या बदलीचा प्रश्नच उद्भवणार नसल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे समजते.या बैठकीतून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला असून, आगामी काळात जिल्हा परिषदेच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड