सोलापुरात भेसळविरोधी मोहीम; २०३ अन्न नमुने तपासणीसाठी, अहवालाची प्रतीक्षा
सोलापूर, 05 जुलै, (हिं.स.)। शहर आणि जिल्ह्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांवर आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने २५ मे ते ३० जून या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान अन्नपदार्थ, खाद्यतेल, दूध, दूध पावडर आणि दुग्धजन्य पदार्थां
fda


सोलापूर, 05 जुलै, (हिं.स.)।

शहर आणि जिल्ह्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांवर आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने २५ मे ते ३० जून या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान अन्नपदार्थ, खाद्यतेल, दूध, दूध पावडर आणि दुग्धजन्य पदार्थांचे एकूण २०३ नमुने तपासणीसाठी अधिकृत प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्यापैकी केवळ दोन नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. उर्वरित २०१ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.या विशेष मोहिमेत दुग्धजन्य पदार्थांचे १८ नमुने स्वतंत्रपणे तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र, प्रयोगशाळांमधील मनुष्यबळाची कमतरता आणि तपासणीसाठी वाढलेल्या नमुन्यांच्या संख्येमुळे अहवाल मिळण्यास विलंब होत आहे.परिणामी, संबंधित दोषींवर पुढील कायदेशीरकारवाईहीरखडली आहे.

कारवाईदरम्यान अन्न व औषध प्रशासनाने १,१२० रुपये किमतीचा ४ किलो खवा तसेच सुमारे ५ लाख ७४ हजार रुपये किमतीची १,१४८ किलो मिल्क पावडर जप्त केली. जप्त केलेल्या या पदार्थांचे नमुने गुणवत्तेच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.भेसळयुक्त अन्नपदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा तपासणी मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande