
पुणे, 05 जुलै (हिं.स.)। हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावर अत्याधुनिक 'थर्ड-रेल' विद्युतीकरण प्रणालीचा वापर करण्यात येणार असून, २३ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर प्रथमच हे आधुनिक तंत्रज्ञान कार्यान्वित होणार आहे. या प्रणालीमुळे मेट्रोचा वीजपुरवठा अधिक कार्यक्षम होणार असून, प्रवाशांना जलद आणि सुरक्षित सेवा मिळणार आहे.सध्या बहुतांश मेट्रो मार्गांवर ओव्हरहेड वायर आणि मास्ट्सच्या साहाय्याने वीजपुरवठा केला जातो. मात्र, थर्ड-रेल प्रणालीमध्ये मेट्रो मार्गाच्या बाजूला बसवलेल्या अतिरिक्त कंडक्टर रेलद्वारेवीजपुरवठा केला जातो.
ट्रेनच्या खाली बसवलेले 'कलेक्टर शूज' थेट या रेलमधून वीज घेत असल्याने ओव्हरहेड उच्चदाब यंत्रणेची आवश्यकता राहत नाही. परिणामी मेट्रो मार्गाचे दृश्य अधिक स्वच्छ आणि आकर्षक दिसते.यापूर्वी हे तंत्रज्ञान कोलकाता आणि बंगळुरूसारख्या निवडक शहरांमध्ये वापरण्यात आले असून, आता पुणेही या अत्याधुनिक प्रणालीचा अवलंब करणाऱ्या शहरांच्या यादीत सामील होत आहे.या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालयदरम्यानचा १३.३ किलोमीटर लांबीचा मार्ग सुरू करण्यात येणार आहे.
या टप्प्यात एकूण १२ स्थानकांचा समावेश आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड–स्वारगेट आणि वनाज–रामवाडी मेट्रो मार्गांशी अखंड जोडणी साधण्यासाठी हा मार्ग शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालय स्थानकापर्यंत विस्तारण्यात येणार आहे.संपूर्ण २३ किलोमीटरचा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर हिंजवडी ते शिवाजीनगर हा प्रवास सध्या लागणाऱ्या सुमारे दीड तासांच्या तुलनेत अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु