कौशिक प्रकाशनच्या सौंदर्यलहरी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
सातारा, 05 जुलै (हिं.स.)। येथील कौशिक प्रकाशनच्या वतीने आद्य श्री शंकराचार्यांनी लिहिलेल्या..सौंदर्यलहरी.. या स्तोत्रावरील मराठी भाषेतील पुस्तकाची निर्मिती डॉ. मीरा दीक्षित व सौ. अंजली गोडबोले यांनी केली. या पुस्तकातून अभ्यासार्थींसाठी आद्यश्रीशंकर
सातारा


सातारा, 05 जुलै (हिं.स.)। येथील कौशिक प्रकाशनच्या वतीने आद्य श्री शंकराचार्यांनी लिहिलेल्या..सौंदर्यलहरी.. या स्तोत्रावरील मराठी भाषेतील पुस्तकाची निर्मिती डॉ. मीरा दीक्षित व सौ. अंजली गोडबोले यांनी केली. या पुस्तकातून अभ्यासार्थींसाठी आद्यश्रीशंकराचार्यांचे विचार व संस्कार परंपरेची जपणूक करण्यासाठी हे पुस्तक मोठे मार्गदर्शक ठरेल असे विचार डॉ. सौ. सुचेता परांजपे यांनी व्यक्त केले..

सातारा येथील कौशिक प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या.. सौंदर्यलहरी.. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सौ. सुचेता परांजपे, (वैदिक वाङ्मयातील विद्यावाचस्पती, वैदिक वाङ्मयाच्या आणि भारतीय विद्या विषयाच्या प्राध्यापिका) पुणे, या होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वे. मू. विवेकशास्त्री गोडबोले, सातारा (प्राचार्य - श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा आणि वेद-वाङ्मयाचे व्यासंगी) होते. सौंदर्य लहरी.. या पुस्तकाच्या लेखिका डॉ.मीरा दीक्षित व सौ. अंजली गोडबोले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती

समर्थ सदन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाची सुरवात चि. प्रचेतन गोडबोले यांनी केलेले ईशस्तवन व सौ. अन्नपूर्णा अघनाशिनी यांनी पठण केलेल्या सौंदर्यलहरीतील निवडक श्लोकांनी झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. प्राजक्ता मराठे, सौ. बकुल फाटक यांनी करून दिला आणि तर लेखिकांचा परिचय सौ. प्रियंवदा गोडबोले व सौ. गीता दीक्षित यांनी करून दिला. या प्रसंगी कौशिक प्रकाशनाच्या श्रीमती अनुपमा गोडबोले, पुस्तक निर्मितीत सहकार्य करणारे उदयन गोडबोले तसेच पुस्तक निर्मितीत विशेष योगदान देणारे संदेश शहा, जतीन शहा, सौ. उर्मिला अराणके, अनुप साधले, चिन्मय गोखले व श्री. परांजपे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी या पुस्तक निर्मिती विषयी बोलताना लेखिका डॉ. मीरा दीक्षित म्हणाल्या की आद्यशंकराचार्यांनी सौंदर्यलहरी या स्तोत्रांमध्ये मानवी जीवनाचे ध्येय बंधनातून मुक्त होत जीवन मुक्त होणे हे असताना अंतिम मोक्षपद अवस्थेपर्यंतचा प्रवास संहार, प्रलय, विनाश अशा भयावह कल्पनांपेक्षा सौंदर्यपूर्ण हळुवारपणे होणारी आनंददायी अनुभूती आहे. बहुरोग परिहारासाठी सौंदर्यलहरी या अक्षय पात्रातील मधुर रसाचे सेवन करून बहु रोगपरिहार झाल्याची अनुभूती या स्तोत्रातून येते. हे पुस्तक लिहिताना विविध अंगी अद्भुत काव्याची तोंड ओळख व्हावी इतकाच मर्यादित हेतू या ठेवला असून एका श्लोकाला एक पान असे सूत्र ठेवत त्यात मूळ श्लोक, अन्वय, सरलार्थ व श्लोकांच्या अर्थाचा अंदाज येण्यासाठी प्रत्येक श्लोकाला विचारपूर्वक शीर्षक दिले आहे.

आद्यशंकराचार्यांच्या या काव्यावर लेखन करणे हे धाडसच होते हे शिव धनुष्य आपल्याला पेलवेल का? अशी भीती होती आमच्या क्षमतेविषयी शंका होती. मात्र निश्चय आणि पुढे जात राहून त्याचे फळ म्हणून हे पुस्तक रूपात साकारता आले, याचा विशेष आनंद आहे .

लेखिका सौ. अंजली गोडबोले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ,या स्तोत्राचा अभ्यास करताना केलेले आमचे जिज्ञासू परिश्रम व त्याला प्राप्त झालेले पुस्तक रुपी मूर्त स्वरूप ही सर्व माता त्रिपूरसुंदरीची कृपा आहे. या पुस्तकाच्या निर्मितीचा अभ्यास एक आनंद यात्राच असून आमच्या दोघींच्या मैत्रीचे हे एक अमरद्योतकच आहे.

प्रमुख पाहुण्या डॉ. सौ. सुचेता परांजपे म्हणाल्या की, सौंदर्यलहरी स्तोत्रावरील निर्मिती झालेले हे पुस्तक खरोखरच अभ्यासू लोकांसाठी एक मार्गदर्शक आहे आद्यश्रीशंकराचार्यांच्या बद्दल मी ज्यावेळी वाचायला लागले. त्यावेळी त्यांच्या प्रचंड कार्याची कल्पना येते. 32 व्या वर्षी आपल्या जीवनाची सांगता करताना त्यांनी विविध विषयांवर केलेले भाष्य व सखोल अभ्यासपूर्ण विवेचन हे खरोखरच थक्क करणारे आहे. आज अनेक विषयांवर संपूर्ण मार्गदर्शन आद्यश्रीशंकराचार्यांच्या विस्तृत वाङ्मयातून होत असते. त्यासाठी या दोन्ही लेखिकांनी केलेला हा प्रयत्न खरोखरच अभिनंदनीय असा आहे.

यावेळी बोलताना वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले म्हणाले की, जगद्गुरु श्री आद्य शंकराचार्य विरचित ..सौंदर्यलहरी.. हे स्तोत्र परब्रम्हाची उपासना करून जीवन मुक्त अवस्थेपर्यंत जाण्याचा मार्ग दाखविणारी अत्यंत लोकप्रिय व प्रभावी स्तोत्र आहे. परब्रम्हाची उपासना शिवशक्तीच्या रुपात करून जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजेच मोक्ष गाठण्यासाठी सगुण व निर्गुण उपासना वर्णन करणारे हे स्तोत्र आहे. या सौंदर्यलहरी वरील स्तोत्रावर अभ्यास करून या दोन्ही लेखिकांनी खऱ्या अर्थाने या संस्कृत स्तोत्राच्या अभ्यास करणाऱ्या इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय सुरेख असे मार्गदर्शनपर पुस्तक निर्माण केले याचे विशेष आनंद व कौतुक वाटते. याच्या अभ्यासासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रद्युम्न गोडबोले यांनी केल्यावर देवीअपराधक्षमापन स्तोत्राने या रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रकाशन सोहळ्यास अशोक गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले, रमेश दीक्षित, रजनीश दीक्षित तसेच दीक्षित व गोडबोले कुटुंबीयांचे स्नेही व विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande