सोलापूर : कुंभारझरी शाळेतील धोकादायक वर्गखोल्या तातडीने पाडण्याची ग्रामस्थांची मागणी
सोलापूर, 05 जुलै (हिं.स.)। जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेतील मोडकळीस आलेल्या व पडीक अवस्थेतील वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पडीत वर्गखोल्यांमध्ये साप,
सोलापूर : कुंभारझरी शाळेतील धोकादायक वर्गखोल्या तातडीने पाडण्याची ग्रामस्थांची मागणी


सोलापूर, 05 जुलै (हिं.स.)। जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेतील मोडकळीस आलेल्या व पडीक अवस्थेतील वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पडीत वर्गखोल्यांमध्ये साप, विंचू आणि इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढल्याने धोकादायक इमारती तातडीने पाडण्यात याव्यात, अन्यथा ग्रामस्थांना त्या पाडण्याची परवानगी द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

कुंभारझरी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे ११७ विद्यार्थी शिक्षण घेत असून पाच शिक्षक कार्यरत आहेत. जुन्या शाळेची इमारत जीर्ण व धोकादायक झाल्यानंतर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन नवीन शाळा इमारतीचे बांधकाम केले आहे. मात्र, नव्या इमारतीच्या अगदी शेजारीच जुन्या व मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या अद्यापही उभ्या असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

जुन्या वर्गखोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचली असून त्याठिकाणी साप, विंचू तसेच इतर वन्य प्राण्यांचा मुक्त संचार होत आहे. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, ही शाळा खडकपूर्णा नदीच्या पात्रालगत असल्याने परिसरात झाडी आणि ओलावा अधिक असून विषारी प्राण्यांचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायतीने नवीन इमारतीची उभारणी केली असली, तरी जुन्या धोकादायक वर्गखोल्या पाडण्यासाठी जिल्हा परिषद जालनाकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे पाडकाम रखडले असून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande