रत्नागिरी : वाकेड घाटात दरडीखाली वृद्ध अडकल्याची भीती
रत्नागिरी, 5 जुलै (हिं.स.) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाकेड (ता. लांजा) घाटात दरड कोसळली असून त्याखाली वृद्ध अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाकेड घाटात सुरू असलेल्या पेट्रोल पंपाच्या बांधकामादरम्यान शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारा
रत्नागिरी : वाकेड घाटात दरडीखाली वृद्ध अडकल्याची भीती


रत्नागिरी, 5 जुलै (हिं.स.) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाकेड (ता. लांजा) घाटात दरड कोसळली असून त्याखाली वृद्ध अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वाकेड घाटात सुरू असलेल्या पेट्रोल पंपाच्या बांधकामादरम्यान शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक दरड कोसळली. या घटनेनंतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. मात्र दरड मोठी असल्याने ती दूर करण्याचे काम आजही सुरू होते.

मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग अचानक खचला. त्यावेळी पावसापासून बचावासाठी कामाच्या ठिकाणी असलेल्या केबिनच्या आडोशाला एक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वृद्ध व्यक्ती थांबली होती. दरड कोसळताच ही व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

या दुर्घटनेवेळी घटनास्थळी काम करणारे जेद अतिकुल त्यागी (वय १८), सुवेल अयुब त्यागी (वय १९) आणि महंमद समीन साहवेज (वय २२) हे तिन्ही कामगार थोडक्यात बचावले. हे तिघेही बिहार राज्यातील रहिवासी असून दरड कोसळताच त्यांनी वेळीच सुरक्षित स्थळी धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या वृद्धाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande