
पुणे, 05 जुलै (हिं.स.)। राज्यातील अंशतः अनुदानित व अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय संघाने ७ आणि ८ जुलै २०२६ रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाची घोषणा केली आहे. या दोन दिवसांत राज्यातील सर्व अंशतः अनुदानित व अनुदानित शाळा बंद ठेवण्यात येणार असून, शिक्षकांनी मोठ्या संख्येने मुंबईतील आझाद मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे राज्य समन्वयक खंडेराव जगदाळे आणि पुणे शहराध्यक्ष सुनील पानसरे यांनी केले आहे.
संघटनेच्या माहितीनुसार, अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, त्यातून राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.या आंदोलनात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील अंशतः अनुदानित व अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच आपल्या न्याय्य मागण्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात, असे आवाहन शिक्षक समन्वय संघाने केले आहे.शिक्षकांच्या या आंदोलनामुळे ७ आणि ८ जुलै रोजी राज्यातील अनेक अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील अध्यापनावर परिणाम होण्याची शक्यता असून, विद्यार्थी आणि पालकांनी त्यानुसार नियोजन करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु