
पुणे, 05 जुलै (हिं.स.)। घर खरेदीची वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाने पुण्यातील आणखी सुमारे ४ हजार घरांच्या सोडतीची तयारी सुरू केली असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलैअखेरीस जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ऑनलाइन नोंदणी, अर्जविक्री आणि अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
यापूर्वी फेब्रुवारीमध्ये पुणे मंडळाने ४,१८६ घरांची सोडत काढली होती. तसेच काही दिवसांपूर्वी ताथवडे येथील ७९२ घरांसाठीची सोडतही पार पडली. आता नव्या टप्प्यात सुमारे ४ हजार घरे उपलब्ध करून देण्याची तयारी मंडळाने सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या ४ हजार घरांपैकी सुमारे ३ हजार घरे ही २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील असून, त्यामुळे खासगी विकासकांच्या प्रकल्पांमध्ये परवडणाऱ्या दरात घर घेण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे.
म्हाडाच्या पुणे मंडळाने संबंधित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे २० टक्के आणि १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनांतील मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होत आहेत. गेल्या वर्षी मंडळाला या योजनांअंतर्गत एकूण ४,१८३ घरे प्राप्त झाली होती. या घरांसाठी सप्टेंबर २०२५ मध्ये सोडतपूर्व प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, तर फेब्रुवारी २०२६ मध्ये सोडत काढण्यात आली.
दरम्यान, पुणे मंडळाला आता २० टक्के योजनेतील आणखी सुमारे ३ हजार घरे उपलब्ध झाली असून, त्यासोबतच रिक्त असलेली सुमारे १ हजार घरे समाविष्ट करून एकूण अंदाजे ४ हजार घरांसाठी नव्या सोडतीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना आणखी एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु