
सोलापूर, 05 जुलै (हिं.स.)।आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे लाखो वारकरी रवाना होत असल्याने त्यांच्या प्रवासाची सोय लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सोलापूर विभागाने विशेष नियोजन केले आहे. वारकरी भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी विभागातून २३५ जादा बसेस विविध मार्गांवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वारीच्या काळातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन पंढरपुरात चार तात्पुरत्या बसस्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच शहराबाहेरील प्रमुख मार्गांवर १२ तपासणी नाके उभारण्यात आले असून, वाहतुकीचे नियोजन अधिक प्रभावीपणे करण्यावर भर देण्यात आला आहे.प्रवासादरम्यान बसेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास वारकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून तातडीच्या दुरुस्तीसाठी विशेष ब्रेकडाऊन पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. या अतिरिक्त यंत्रणेमुळे वारीच्या कालावधीत वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि बससेवा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.आषाढी वारीदरम्यान एसटी प्रशासनातील अधिकारी, चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचारी २४ तास सेवेत कार्यरत राहणार आहेत. याशिवाय शासनाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिला सन्मान योजना तसेच दिव्यांग प्रवासी सवलत यांसह सर्व प्रवासी सवलती वारीच्या काळातही लागू राहणार असल्याने वारकरी भाविकांना त्याचा लाभ मिळणार आहे.एसटी प्रशासनाने वारकऱ्यांना नियोजनबद्ध प्रवास करण्याचे आवाहन करत, अतिरिक्त बससेवेचा लाभ घेण्याचेही आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड