पुणे : पीएम पोषण योजनेत ऑनलाइन नोंदी सक्तीच्या; शिक्षण संचालकांचे आदेश
पुणे, 05 जुलै (हिं.स.)। प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण (पीएम पोषण) योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये तांदूळ व धान्यादी मालाचा साठा, त्याचा खर्च, शिल्लक साठा तसेच दैनंदिन लाभार्थी नोंदी आता पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने ठेवण्यात येणार आहेत. त्
पुणे : पीएम पोषण योजनेत ऑनलाइन नोंदी सक्तीच्या; शिक्षण संचालकांचे आदेश


पुणे, 05 जुलै (हिं.स.)। प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण (पीएम पोषण) योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये तांदूळ व धान्यादी मालाचा साठा, त्याचा खर्च, शिल्लक साठा तसेच दैनंदिन लाभार्थी नोंदी आता पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे शाळांना यापुढे स्वतंत्र नोंदवही ठेवण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी आणि संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, सर्व पात्र शाळांनी ३० एप्रिल २०२६ अखेर अथवा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील आहार वितरणाच्या शेवटच्या दिवसानुसार उपलब्ध असलेल्या तांदूळ व धान्यादी मालाच्या शिल्लक साठ्याची नोंद एमडीएम (मिड-डे मील) पोर्टलवरील 'सुरुवातीची शिल्लक' (Opening Balance) या टॅबमध्ये करणे बंधनकारक राहणार आहे. ही नोंद इयत्ता १ ली ते ५ वी आणि इयत्ता ६ वी ते ८ वी अशा स्वतंत्र गटांनुसार किलोग्रॅममध्ये करावी लागणार आहे. शिल्लक साठ्याची माहिती भरल्यानंतर संबंधित शाळांनी तिची पडताळणी करून ती जतन (Save) आणि अंतिम (Final Submit) करणे आवश्यक असेल.याशिवाय, प्रत्येक महिन्याच्या अखेरीस धान्य खर्च आणि शिल्लक साठ्याचा एकत्रित पीडीएफ अहवाल एमडीएम पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. हा अहवाल जतन करून ठेवला तर स्वतंत्र नोंदवही ठेवण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे शाळांवरील प्रशासकीय कामाचा ताण कमी होण्यासोबतच धान्य साठ्याचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि प्रभावी होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande