पुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावांतील नागरिकांना मालमत्ता खरेदीपूर्वी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचे आवाहन
पुणे, 05 जुलै (हिं.स.)। महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील नागरिकांनी प्लॉट, भूखंड किंवा सदनिका खरेदी करण्यापूर्वी संबंधित प्रकल्पाची बांधकाम परवानगी, मंजूर ले-आऊट, विकास आराखडा तसेच इतर आवश्यक कायदेशीर कागदपत्रांची सखोल पडताळणी करूनच
pmc


पुणे, 05 जुलै (हिं.स.)। महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील नागरिकांनी प्लॉट, भूखंड किंवा सदनिका खरेदी करण्यापूर्वी संबंधित प्रकल्पाची बांधकाम परवानगी, मंजूर ले-आऊट, विकास आराखडा तसेच इतर आवश्यक कायदेशीर कागदपत्रांची सखोल पडताळणी करूनच व्यवहार करावा, असे आवाहन महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी केले आहे.

महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे आणि बेकायदा प्लॉटिंग होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बांधकामांवर महापालिकेकडून नियमितपणे कारवाई करण्यात येत असली, तरी अनेक नागरिक अनधिकृत प्रकल्पांमध्ये सदनिका किंवा प्लॉट खरेदी केल्यानंतर अडचणीत येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी संबंधित प्रकल्पाला सर्व आवश्यक शासकीय आणि महापालिकेच्या मंजुरी मिळाल्या आहेत का, याची खातरजमा करावी, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

अनधिकृत प्लॉटिंगमधील भूखंड किंवा बेकायदा बांधकामांतील सदनिका खरेदी केल्यास भविष्यात बांधकाम परवानगी, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते, वीजपुरवठा तसेच इतर नागरी सुविधा मिळविताना गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आर्थिक फसवणूक आणि कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी नागरिकांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच मालमत्ता व्यवहार करावेत, असे आवाहन शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande