पुण्यात जुलै ते सप्टेंबर दरम्यान १०० प्रशिक्षित ट्रॅफिक वॉर्डन्स करणार तैनात
पुणे, 05 जुलै (हिं.स.)। पावसाळ्यात वाढणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन शहरातील वाहतूक व्यवस्थापनाला बळकटी देण्यासाठी ''क्रेडाई पुणे''ने पुणे शहर पोलिसांसोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत १०० प्रशिक्षित ट्रॅफिक वॉर्डन्स
Pune Police


पुणे, 05 जुलै (हिं.स.)। पावसाळ्यात वाढणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन शहरातील वाहतूक व्यवस्थापनाला बळकटी देण्यासाठी 'क्रेडाई पुणे'ने पुणे शहर पोलिसांसोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत १०० प्रशिक्षित ट्रॅफिक वॉर्डन्स शहरातील प्रमुख चौक आणि संवेदनशील ठिकाणी वाहतूक पोलिसांना सहाय्य करणार आहेत. या उपक्रमाच्या प्रारंभप्रसंगी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह-पोलीस आयुक्त संजय दराडे, वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, 'क्रेडाई पुणे'चे अध्यक्ष मनीष जैन यांच्या सह आदी उपस्थित होते.

शहरात सुरू असलेली रस्ते आणि मेट्रोची विकासकामे तसेच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. अशा वेळी 'क्रेडाई'चे प्रशिक्षित स्वयंसेवक वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमन, कोंडी कमी करणे आणि गर्दीच्या वेळेत तसेच सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान सुरक्षितता राखण्यासाठी मदत करणार आहेत.या सर्व ट्रॅफिक वॉर्डन्सना वाहतूक नियम, प्रत्यक्ष कार्यपद्धती आणि वाहतूक नियंत्रणाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. करार पद्धतीवर कार्यरत असलेले हे वॉर्डन्स दररोज सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत नियोजित विश्रांतीसह सेवा देतील.

कार्यक्षमता वाढविण्यासाठी जवळपास निम्म्या वॉर्डन्सची नियुक्ती त्यांच्या निवासस्थानाजवळील परिसरात करण्यात येणार असून, उर्वरित वॉर्डन्सना वाहतूक पोलिसांच्या गरजेनुसार शहरातील प्रमुख चौक आणि संवेदनशील ठिकाणी तैनात केले जाईल.यावेळी बोलताना 'क्रेडाई पुणे'चे अध्यक्ष मनीष जैन म्हणाले, शहराच्या विकासात योगदान देणे म्हणजे केवळ घरे उभारणे नव्हे, तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडविण्यातही सहभाग घेणे आहे. मान्सून काळात पुणे वाहतूक पोलिसांच्या कार्याला बळ देण्यासाठी हा उपक्रम राबविताना आम्हाला आनंद होत आहे. अतिरिक्त प्रशिक्षित मनुष्यबळामुळे वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत होईल, असा विश्वास आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande