पुण्यात १४.५० लाख वाहने अजूनही एचएसआरपीविना; दंडात्मक कारवाईला सुरुवात
पुणे, 05 जुलै (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी राज्य परिवहन विभागाने मागील दीड वर्षात सहा वेळा मुदतव
HSRP


पुणे, 05 जुलै (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी राज्य परिवहन विभागाने मागील दीड वर्षात सहा वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र, ३० जून रोजी अंतिम मुदत संपल्यानंतर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वायुवेग पथकाने आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे विना एचएसआरपी वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

१ जुलैपासून सुरू झालेल्या या मोहिमेत एचएसआरपी नसलेल्या प्रत्येक वाहनचालकाकडून १,००० रुपयांचा दंड आकारला जात आहे. विशेष म्हणजे, पुणे शहरात आजही सुमारे १४ लाख ५० हजार वाहने एचएसआरपीविना रस्त्यावर धावत असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.एचएसआरपी नसलेल्या वाहनधारकांना आता आरटीओच्या अनेक महत्त्वाच्या सेवांचाही लाभ घेता येणार नाही. यामध्ये वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढवणे किंवा उतरवणे तसेच नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण यांसारख्या सेवांचा समावेश आहे.

दरम्यान, ज्या वाहनधारकांनी ३० जून किंवा त्यापूर्वी अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर एचएसआरपीसाठी नोंदणी करून अपॉइंटमेंट निश्चित केली आहे, त्यांना तपासणीदरम्यान बुकिंगची पावती दाखवल्यास दंडात्मक कारवाईतून सूट दिली जाणार आहे.आरटीओ प्रशासनाने वाहनधारकांना विलंब न करता अधिकृत पोर्टलवर एचएसआरपीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे पालन करून दंड आणि प्रशासकीय अडचणी टाळण्याचा सल्ला दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande