
पुणे, 05 जुलै (हिं.स.) । पोस्टाच्या जुन्या इमारतींमधील पायाभूत सुविधांचा विस्तार आणि पुनर्विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याची माहिती पुणे डाक क्षेत्राच्या पोस्टमास्तर जनरल प्रीती अग्रवाल यांनी दिली. तसेच, पुण्यातील मुख्य टपाल कार्यालयाच्या वारसा इमारतीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी क्षेत्रीय डाक सेवा संचालक अभिजीत बनसोडे उपस्थित होते.
पोस्टाच्या जुन्या इमारतींमधील पायाभूत सुविधांच्या कमतरतेबाबत विचारले असता अग्रवाल म्हणाल्या की, पुणे डाक क्षेत्रात पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांचा समावेश असून, या क्षेत्राअंतर्गत दहा टपाल विभाग कार्यरत आहेत. या विभागांमार्फत नागरिकांना टपाल सेवा अखंडपणे उपलब्ध करून दिल्या जात आहेत.त्या पुढे म्हणाल्या, काही जुन्या टपाल इमारतींमध्ये पायाभूत सुविधांशी संबंधित अडचणी आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यालयातील आवश्यक सुविधांचा विस्तार करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. प्राधान्यक्रम ठरवून टप्प्याटप्प्याने इमारतींचा पुनर्विकास केला जाईल. ज्या ठिकाणी गरज अधिक आहे, त्या कार्यालयांपासून कामांना सुरुवात करण्यात येईल.मुख्य टपाल कार्यालयाच्या वारसा इमारतीच्या पुनर्विकासामुळे ऐतिहासिक वास्तूचे जतन करत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असून, त्याचा लाभ कर्मचारी आणि नागरिकांना होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु