
पुणे, 05 जुलै (हिं.स.)। शहरात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत झाडपडीच्या एकूण २९ घटनांची नोंद झाली.
या सर्व घटनांवर अग्निशमन दलाने तातडीने प्रतिसाद देत मदत व बचावकार्य पूर्ण केले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला शहरातील विविध भागांतून झाडे व फांद्या रस्त्यावर कोसळल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित अग्निशमन केंद्रांतील पथके तात्काळ घटनास्थळी रवाना झाली. पथकांनी झाडे व फांद्या हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली.
झाडपडीच्या घटनांमध्ये एरंडवणे, कोथरूड, गणेश पेठ, बावधन बुद्रुक, कोरेगाव पार्क, येरवडा, मगरपट्टा सिटी, शिवाजीनगर, सेनापती बापट रस्ता, नारायण पेठ, वारजे माळवाडी, चिंचवड, कोंढवा खुर्द, पाषाण, बाणेर आणि बालेवाडी या परिसरांचा समावेश आहे.प्रमुख घटनांमध्ये एरंडवणे येथील मुक्ता रेस्टॉरंटजवळ, कोथरूडमधील करिष्मा सोसायटी परिसरात, गणेश पेठेतील चोखा मेळा चौकाजवळ, बावधनमधील योगा सेंटर परिसरात तसेच कोरेगाव पार्कमधील लेन क्रमांक पाच येथे झाडे कोसळली.
याशिवाय मगरपट्टा सिटी, शिवाजीनगर, सेनापती बापट रस्ता, वारजे माळवाडी आणि चिंचवड परिसरात झाडे व फांद्या रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.सतत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या झाडांखाली किंवा धोकादायक ठिकाणी वाहन उभी करू नयेत तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु