
सोलापूर, 05 जुलै (हिं.स.)।
सोलापूरच्या श्रेया जयकुमार माने हिने गुजरातमधील धोलावीरा येथे आयोजित करण्यात आलेले ‘लूनर अनालॉग मिशन’ यशस्वीरीत्या पूर्ण करून अवकाश संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. भविष्यातील मानवी चंद्र मोहिमांसाठी आवश्यक प्रशिक्षण देणाऱ्या या मोहिमेत श्रेयाने ‘क्रू सायकॉलॉजिस्ट’ म्हणून महत्त्वाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत सोलापूरच्या नावाला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून दिला आहे.
आका स्पेस संस्थेतर्फे आयोजित या मोहिमेत चंद्रावरील वास्तव्यासारखे वातावरण कृत्रिमरित्या तयार करण्यात आले होते. या माध्यमातून सहभागी सदस्यांना वैज्ञानिक संशोधन, ईव्हीए (EVA) सिम्युलेशन, हॅबिटॅट ऑपरेशन्स, संसाधन व्यवस्थापन, मिशन नियोजन तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
मोहिमेदरम्यान श्रेया माने यांनी ‘क्रू सायकॉलॉजिस्ट’ म्हणून सहकारी सदस्यांच्या मानसिक आरोग्याचे मूल्यमापन, तणाव व्यवस्थापन, नेतृत्व कौशल्य विकास आणि संघभावना बळकट करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या कार्याची मोहिमेत विशेष दखल घेण्यात आली.
या मोहिमेचे नेतृत्व मिशन कमांडर कीर्ती विप्पर्थी यांनी केले. गीतांजली राजपूत यांनी ईव्हीए लीड, श्रेया जयकुमार माने यांनी क्रू सायकॉलॉजिस्ट, तर प्रियांदर्शिनी अय्यनार यांनी मेडिकल ऑफिसर म्हणून जबाबदारी सांभाळली.
श्रेया जयकुमार माने या माजी आमदार ब्रह्मदेव माने यांच्या नात, सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक जयकुमार माने व प्रिया माने यांच्या कन्या तसेच माजी आमदार दिलीप माने यांच्या पुतणी आहेत. अवकाश संशोधनासारख्या अत्यंत आव्हानात्मक क्षेत्रात मिळविलेल्या या यशामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशामुळे सोलापूरच्या गौरवशाली परंपरेत आणखी एका मानाच्या अध्यायाची भर पडली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड