सोलापुरातील सहकारी साखर कारखानदारी अडचणीत; १६ पैकी ४ कारखाने बंद
सोलापूर, 05 जुलै (हिं.स.)। एकेकाळी सहकारी साखर कारखानदारीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सहकाराची गोडी आता ओसरताना दिसत आहे. जिल्ह्यातील १६ सहकारी साखर कारखान्यांपैकी चार कारखाने बंद पडले असून, दोन कारखाने सध्या भाडेपट्ट्यावर च
sugar mill


सोलापूर, 05 जुलै (हिं.स.)।

एकेकाळी सहकारी साखर कारखानदारीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सहकाराची गोडी आता ओसरताना दिसत आहे. जिल्ह्यातील १६ सहकारी साखर कारखान्यांपैकी चार कारखाने बंद पडले असून, दोन कारखाने सध्या भाडेपट्ट्यावर चालविले जात आहेत. आर्थिक अडचणींमुळे आगामी गाळप हंगामात आणखी चार सहकारी कारखाने भाडेपट्ट्यावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.केंद्र सरकारची धोरणे, ऊस प्रक्रिया आणि उत्पादनाचा वाढता खर्च, साखरेला मिळणारा तुलनेने कमी दर तसेच काही कारखान्यांमधील व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे सहकारी साखर उद्योग आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे चित्र आहे.

सोलापूर जिल्ह्यात एकूण ४० साखर कारखाने असून, त्यापैकी २४ खासगी आणि १६ सहकारी तत्त्वावरील आहेत. आशिया खंडात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. सहकाराच्या बळावर या उद्योगाने अनेक दशकांपर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिशा दिली.माजी खासदार सुधाकरपंत परिचारक यांनी खासगी साखर कारखाना विकत घेऊन तो सहकारी तत्त्वावर सुरू करत राज्यात वेगळा आदर्श निर्माण केला. त्याचप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री शंकरराव मोहिते-पाटील यांनी दुष्काळी भागात सहकारी साखर कारखाने उभारून शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी दिली. औदुंबर पाटील, आप्पासाहेब काडादी यांच्यासह अनेक सहकार नेत्यांनी साखर कारखानदारीच्या माध्यमातून ग्रामीण भागात हरितक्रांती घडवून आणण्यास मोलाचे योगदान दिले.सहकारी साखर कारखान्यांनी केवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमीची बाजारपेठ उपलब्ध करून दिली नाही, तर शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक विकासालाही मोठी चालना दिली. त्यामुळे हा उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात होता.त्यानंतरच्या काळात माजी आमदार बबनदादा शिंदे यांनीही सहकारी साखर कारखानदारीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. मात्र, बदलती आर्थिक परिस्थिती, वाढती स्पर्धा आणि वित्तीय अडचणींमुळे सहकारी साखर उद्योगासमोर अस्तित्वाचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी ठोस धोरणात्मक उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande