
अमरावती, 08 जुलै (हिं.स.) | वर्षभर दैनंदिन व्यापात अडकलेला वारकरी विठूमाऊलीच्या भेटीसाठी आतूर झालेला असतो. लाखो विठ्ठलभक्त चंद्रभागेच्या वाळवंटात हरिनामाचा गजर करण्यासाठी, स्वतःला विठ्ठलचरणी लीन करण्यासाठी दरवर्षी पंढरपूरची वाट धरतात. भक्तांची हीच श्रद्धा आणि पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
२५४ विशेष बसेस धावणार
यंदा वारकऱ्यांच्या सुविधेसाठी अमरावती जिल्ह्यातून २५४ विशेष बसेस सोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३६ बसेस अधिक धावणार आहेत. ही विशेष बससेवा १७ जुलैपासून ते ३१ जुलै २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. आषाढी एकादशी २५ जुलै रोजी असल्याने, १७ जुलैपासून पंढरपूरसाठी जाणाऱ्या बसेसची संख्या वाढवली जाईल. २८ जुलैपर्यंत प्रवाशांना पंढरपूर पोहचवण्यासाठी आणि त्यानंतर २८ ते ३१ जुलै या कालावधीत भाविकांना सुखरुप परत आणण्यासाठी या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
भीमा बसस्थानकावर अंतिम थांबा
अनेक वारकरी पौर्णिमेपर्यंत पंढरपुरातच मुक्काम करीत असल्याने ३१ जुलैपर्यंत परतीचा प्रवास सुरू राहणार आहे. अमरावती जिल्ह्यातील आठ आगारांमधून सुटणाऱ्या या सर्व विशेष बसगाड्यांचा अंतिम थांबा पंढरपूर येथील भीमा बसस्थानक असणार आहे. अमरावती जिल्ह्यातील प्रवाशांना याच स्थानकावर सोडण्यात येईल आणि परतीसाठी याच स्थानकावरून बसेस उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
या विशेष बस फेऱ्यांमध्येही शासनाच्या सवलत योजना लागू राहणार आहेत. ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजने’अंतर्गत ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रवाशांना मोफत प्रवासाचा लाभ घेता येईल. या दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी अमरावती विभागाकडून मुख्यत: ‘लालपरी’चा वापर केला जाणार आहे.
कोणत्याही गावातून बससेवा
कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बससेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. थेट बससेवेसाठी जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलीस प्रशासनासोबत कार्यरत राहणार आहेत. यामुळे वाहतूक नियोजन अधिक प्रभावी होऊन भाविकांचा प्रवास सुलभ होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी