
बीड, 08 जुलै (हिं.स.)। ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अंबाजोगाई महावितरणचा कार्यकारी अभियंता याला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे करण्यासाठी कशा प्रकारे अडवणूक करून त्यांना वेठीस धरले जाते, हे या संतापजनक घटनेवरून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
तक्रारदाराने नुकताच आपला एक्वा प्लांट सुरू केला असून त्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसविण्याची आवश्यकता होती. ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावावर सही करून मंजुरी देण्याच्या मोबदल्यात कार्यकारी अभियंता याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. स्वतःच्या हक्काच्या कामासाठीही पैसे मोजावे लागत असल्याने त्रस्त झालेल्या तक्रारदाराने तत्काळ बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची पडताळणी करून महावितरण कार्यालयातच सापळा रचला. तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला कार्यालयातून रंगेहाथ ताब्यात घेतले.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्धरीत्या ही कारवाई यशस्वी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis