पावसाची कृपा; रायगडकरांची तहान भागली!
रायगड, 08 जुलै (हिं.स.)। गेल्या आठवडाभरापासून रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अखेर नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे आणि धरणांमधील पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, २८ प्रमुख धरणांपैकी तब्बल १९ धरण
Blessing-of-the-rains-the-thi


रायगड, 08 जुलै (हिं.स.)। गेल्या आठवडाभरापासून रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अखेर नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे आणि धरणांमधील पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, २८ प्रमुख धरणांपैकी तब्बल १९ धरणे शंभर टक्के भरली आहेत. परिणामी जिल्ह्याचा एकूण जलसाठा ८४.३७ टक्क्यांवर पोहोचला असून, यंदाच्या वर्षासाठी पिण्याच्या पाण्याची चिंता जवळपास संपुष्टात आली आहे.

अतिवृष्टीमुळे काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली असली, तरी या पावसामुळे जलसंपत्ती मोठ्या प्रमाणात समृद्ध झाली आहे. जलसाठ्यात झालेली वाढ शेती, पिण्याचे पाणी, उद्योग आणि भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणांमध्ये रोहा तालुक्यातील सुतारवाडी, सुधागडमधील कोंडगाव, घोटवडे, कवेळे व उन्हेरे, म्हसळ्यातील पाभरे व संदेरी, महाडमधील कोथुर्डे, खैरे, वरंध व खिंडवाडी, मुरूडमधील फणसाड, तळ्यातील वावा, पेणमधील आंबेघर, खालापूरमधील भिलवले, कोलते-मोकाशी व डोणवत, पनवेलमधील मोरबे तसेच श्रीवर्धनमधील कुडकी धरणांचा समावेश आहे.

याशिवाय पनवेल तालुक्यातील उसरण आणि बामणोली धरणांमध्ये सुमारे ९० टक्के जलसाठा झाला आहे. ढोकशेत, कार्ले, रानिवली, साळोख आणि अवसरे या धरणांमध्येही ५० टक्क्यांहून अधिक पाणी साचले असून, पुढील काही दिवसांत ही धरणेही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उर्वरित धरणांमधील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा असून, यंदाच्या दमदार पावसामुळे रायगड जिल्ह्याची जलसुरक्षा भक्कम झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande