
रत्नागिरी, 8 जुलै (हिं.स.) । प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी जिल्ह्यात भात आणि नाचणी पिकांचा विमा उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
यंदा राज्यात अल-निनोचे संकट पाहता, संभाव्य नैसर्गिक आपत्तीपासून आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ८३ महसूल मंडळांमध्ये भात व नाचणी या अधिसूचित पिकांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील
सहभाग ऐच्छिक आहे. पीक कर्ज घेतलेल्या आणि न घेतलेल्या (कर्जदार व बिगर कर्जदार) अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी या योजनेतील सहभाग पूर्णपणे ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी AGRISTACK शेतकरी ओळख क्रमांक असणे अनिवार्य आहे. तसेच डिजिटल क्रॉप सर्व्हेअंतर्गत ई-पीक पाहणी करणे बंधनकारक राहील. कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेस पात्र आहेत, मात्र त्यांना नोंदणीकृत भाडेकरार पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. योजनेत शेतकरी सहभागासाठी प्रतिअर्ज किमान ०.१० हेक्टर क्षेत्राची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी विम्याचा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के (जोखीम स्तर ७० टक्के) असून, भातपिकासाठी ६५० रुपये प्रतिहेक्टर तर नाचणी पिकासाठी ४०० रुपये प्रतिहेक्टर असा दर निश्चित करण्यात आला आहे.
पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास, त्यांनी अंतिम मुदतीपूर्वी किमान ७ दिवस आधी संबंधित बँकेला लेखी कळवणे गरजेचे आहे.
जिल्ह्यासाठी इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, कोणतीही माहिती किंवा तक्रारीसाठी supportagri@iffcotokio.co.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधता येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या खरीप पिकांना सुरक्षित करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी