रत्नागिरी जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळांवर प्रवेशबंदी
रत्नागिरी, 8 जुलै (हिं.स.) । जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती, पाण्याच्या प्रवाहात झालेली वाढ आणि भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने धोकादायक वर्षा पर्यटन स्थळांवर निर्बंध लागू केले आहेत. या निर्णयाची ता
रत्नागिरी जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळांवर प्रवेशबंदी


रत्नागिरी, 8 जुलै (हिं.स.) । जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती, पाण्याच्या प्रवाहात झालेली वाढ आणि भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने धोकादायक वर्षा पर्यटन स्थळांवर निर्बंध लागू केले आहेत. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार पानवल धबधबा, पानवल धरण, भाट्ये बीच, गणपतीपुळे समुद्रकिनारा, निवळी धबधबा तसेच आरे-वारे पर्यटनस्थळांवर पर्यटकांना पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला असून पर्यटकांना धोकादायक भागात जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

कोकणात वर्षा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होत असताना कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

दरम्यान, चिपळूण तालुक्यातील सवतसडा धबधबा येथे आवश्यक सुरक्षा उपाययोजना आणि प्रशासनाच्या देखरेखीखाली पर्यटन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना निर्बंधित पर्यटनस्थळांवर जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे आणि आदेशांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande