लातूर - 'सत्यमेव जयते फार्मर कप' स्पर्धेला नवी गती
लातूर, 08 जुलै, (हिं.स.)। सत्यमेव जयते फार्मर कप २०२६'' स्पर्धेअंतर्गत लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २५५ हून अधिक शेतकरी गटांना प्रत्यक्ष क्षेत्रभेट देत विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील शेतकरी गटांचे काम प्रत्यक्ष पाहून त्यांना मार्गदर्श
सत्यमेव जयते फार्मर कप


लातूर, 08 जुलै, (हिं.स.)। सत्यमेव जयते फार्मर कप २०२६' स्पर्धेअंतर्गत लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २५५ हून अधिक शेतकरी गटांना प्रत्यक्ष क्षेत्रभेट देत विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील शेतकरी गटांचे काम प्रत्यक्ष पाहून त्यांना मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि आधुनिक शेतीविषयक माहिती देण्यात आली.

ही मोहीम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली 'उमेद' अभियान, कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली. सर्व क्षेत्रभेटींची नोंद 'कोबो ॲप'मध्ये करण्यात आली.

क्षेत्रभेटीदरम्यान गट स्थापनेपासून आजपर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. शेतकरी गटांच्या एकत्रित प्रयत्नांचे कौतुक करत पुढील नियोजनासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच व्हिडिओ संवादाचे महत्त्व, त्याचे फायदे, गटांचे अनुभव आणि एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतीचे नियोजन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी स्मार्ट शेती ॲपचा प्रभावी वापर, प्रत्येक सदस्याने करावयाच्या नोंदी, गटाची जबाबदारी, मूल्यांकन प्रक्रिया तसेच उत्पादन वाढीसाठी आवश्यक कार्यपद्धतीचे पालन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला.

नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क तसेच जैविक निविष्ठांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. गटशेतीचा अवलंब करून सामूहिक शेतीच्या माध्यमातून अधिक उत्पादन आणि शाश्वत शेती साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित करण्यात आले.

ही मोहीम कृषी विभाग, उमेद अभियानाचे अधिकारी, मेंटॉर, जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक तसेच प्रभाग समन्वयक यांच्या सहभागातून राबविण्यात आली. मोहिमेचे नियोजन देवकुमार कांबळे, पांडुरंग जेटनवरे, ऋतुजा चव्हाण आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले.

या विशेष उपक्रमामुळे शेतकरी गटांमध्ये उत्साह, आत्मविश्वास आणि सामूहिक कामाची भावना अधिक बळकट झाली असून आगामी काळात शाश्वत आणि नियोजनबद्ध शेतीसाठी कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन प्रकल्प संचालक संजय इंगळे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande