इंधन दरवाढीचा ट्रक भाड्यावर परिणाम; जूनमध्ये भाडे वाढ, पण मालवाहतूक मागणी मंदच
मुंबई, 08 जुलै (हिं.स.) - इंधनाच्या वाढलेल्या किमतींमुळे जून महिन्यात देशातील प्रमुख मार्गांवरील ट्रक भाड्यात वाढ झाली. मात्र, मालवाहतुकीची मागणी अद्यापही मंद असल्याने वाहनांचा वापर अपेक्षेपेक्षा कमी राहिला, असे श्रीराम मोबिलिटी बुलेटिनमध्ये नमूद क
इंधन दरवाढीचा ट्रक भाड्यावर परिणाम; जूनमध्ये भाडे वाढ, पण मालवाहतूक मागणी मंदच


मुंबई, 08 जुलै (हिं.स.) - इंधनाच्या वाढलेल्या किमतींमुळे जून महिन्यात देशातील प्रमुख मार्गांवरील ट्रक भाड्यात वाढ झाली. मात्र, मालवाहतुकीची मागणी अद्यापही मंद असल्याने वाहनांचा वापर अपेक्षेपेक्षा कमी राहिला, असे श्रीराम मोबिलिटी बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दिल्ली–कोलकाता, मुंबई–कोलकाता, दिल्ली–बंगळुरू, दिल्ली–मुंबई, दिल्ली–हैदराबाद, दिल्ली–चेन्नई आणि मुंबई–चेन्नई या प्रमुख मार्गांवर ट्रक भाड्यात १.५ ते २ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. तर बंगळुरू–कोलकाता आणि बंगळुरू–मुंबई मार्गांवर भाडे स्थिर राहिले, यावरून दक्षिण भारतातील काही मार्गांवर मालवाहतुकीची मागणी कमी असल्याचे दिसून आले.

वर्षभराच्या तुलनेत मात्र ट्रक वाहतुकीत सकारात्मक चित्र दिसले. यात दिल्ली-कोलकाता मार्गावर सुमारे १५% वाढ झाली, त्यानंतर बेंगळुरू-मुंबई मार्गावर सुमारे ११% वाढ झाली. तसेच मुंबई-चेन्नई आणि दिल्ली-मुंबई मार्गांवर प्रत्येकी ७-८% वाढ झाली, जे मालवाहतुकीचे प्रमाण कमी असूनही लांब पल्ल्याच्या वाहतुकीची मागणी टिकून असल्याचे दर्शवते.

वाहन विक्रीत संमिश्र चित्र

जूनमध्ये बस विक्रीत सुमारे २४ टक्के आणि कृषी ट्रॅक्टर विक्रीत १८ टक्क्यांची वाढ झाली. याशिवाय व्यावसायिक ट्रॅक्टर आणि अर्थमूव्हिंग उपकरणांच्या विक्रीतही वाढ झाली. मात्र, मोटार कार विक्रीत २ टक्के आणि ई-रिक्षा विक्रीत ३ टक्क्यांची घट झाली. वार्षिक तुलनेत मालवाहू वाहनांची विक्री २१ टक्के, मोटार कार विक्री २८ टक्के आणि तीनचाकी मालवाहू वाहनांची विक्री तब्बल ४२ टक्क्यांनी वाढली.

इलेक्ट्रिक वाहनांचा वेग कायम

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात वाढीचा वेग कायम असून, ई-दुचाकी विक्रीत महिन्याभरात १३ टक्के आणि ई-तीनचाकी विक्रीत १० टक्के वाढ झाली. वार्षिक तुलनेत ई-दुचाकी विक्री ९१ टक्के आणि ई-तीनचाकी विक्री १०३ टक्क्यांनी वाढल्याने इलेक्ट्रिक मोबिलिटीला मिळणारा प्रतिसाद अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले.

जुलैमध्येही लॉजिस्टिक्स क्षेत्रावर पावसाचा परिणाम

श्रीराम फायनान्सचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (कमर्शियल व्हेइकल्स) सुदर्शन होळा यांनी सांगितले की, इंधनाच्या वाढलेल्या किमतींमुळे ट्रक भाडे वाढले असले तरी मालवाहतुकीची मागणी अद्याप कमकुवत आहे. मान्सूनचा वेग वाढत असल्याने जुलै महिन्यातही ट्रक वाहतूक मर्यादित राहण्याची शक्यता आहे. तसेच एनसीआरमध्ये प्री-बीएस VI ट्रकांच्या संचालनाबाबत सरकारच्या निर्णयाकडे संपूर्ण लॉजिस्टिक्स क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

इंधन वापर आणि FASTag व्यवहारात घट

जूनमध्ये पेट्रोलच्या वापरात सुमारे ३ टक्क्यांची घट झाली. तसेच FASTag व्यवहारांच्या संख्येत ३.६ टक्के आणि मूल्यामध्ये १.३ टक्के घट नोंदविण्यात आली. यावरून महामार्गावरील वाहतूक आणि मालवाहतुकीचा वेग मे महिन्याच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असल्याने आगामी काळात इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायाला काहीसा दिलासा मिळू शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande