जळगाव महापालिकेतील घरकूल प्रकरणाची महत्त्वाची फाईल गहाळ; अज्ञाताविरुद्ध गुन्हा
जळगाव , 08 जुलै (हिं.स.)जळगाव महापालिकेच्या बहुचर्चित घरकूल प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची भूसंपादनाची फाईल तब्बल अडीच वर्षांपासून गायब असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी
जळगाव महापालिकेतील घरकूल प्रकरणाची महत्त्वाची फाईल गहाळ; अज्ञाताविरुद्ध गुन्हा


जळगाव , 08 जुलै (हिं.स.)जळगाव महापालिकेच्या बहुचर्चित घरकूल प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची भूसंपादनाची फाईल तब्बल अडीच वर्षांपासून गायब असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी महापालिकेच्या रेकॉर्ड रूममध्ये जाऊन पंचनामा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील घरकूल योजनेशी संबंधित गट क्रमांक ३३७/३ अ/१ आणि ३३७/३ अ/२ या भूसंपादन प्रकरणाची नव्याने तयार करण्यात आलेली फाईल महापालिकेच्या अभिलेख विभागात सुरक्षित ठेवण्यात आली होती. मात्र ३१ जानेवारी २०२४ पासून न्यायालयीन कामकाजासाठी वारंवार मागणी करूनही संबंधित फाईल रेकॉर्ड रूममध्ये उपलब्ध होत नसल्याचे समोर आले. यापूर्वी घरकूल गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासादरम्यान महापालिकेतील १४ फाईल्स जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर संबंधित प्रकरणासाठी स्वतंत्र फाईल तयार करण्यात आली होती. मात्र हीच फाईल आता बेपत्ता झाल्याने संशय अधिक गडद झाला आहे.फाईलचा शोध घेण्यासाठी नगररचना विभागाने आणि अभिलेख विभागाने अनेकदा प्रयत्न केले. तरीही फाईल न सापडल्याने तत्कालीन महापालिका आयुक्तांनी पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगररचनाकार अमोल पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, तपासी अधिकारी जितेंद्र तावडे आणि प्रफुल्ल धांडे यांनी सोमवारी महापालिकेत भेट देऊन दोन पंचांच्या उपस्थितीत रेकॉर्ड रूमचा पंचनामा केला. तसेच नगररचना विभागातील अधिकाऱ्यांकडून प्राथमिक माहितीही घेतली. या संवेदनशील प्रकरणात अधिक पुरावे आणि कागदपत्रे गोळा करण्यासाठी पोलिसांकडून महापालिकेला अधिकृत पत्र पाठविण्यात येणार आहे. फाईल नेमकी कशी आणि कोणाकडून गायब झाली, तसेच न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आले का, या सर्व बाबींचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande