
जळगाव, 08 जुलै (हिं.स.) | अर्ध्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाला अखेर पावसाने मोठा दिलासा दिला आहे. नाशिक आणि मालेगाव परिसरातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली असून, अवघ्या २४ तासात उपयुक्त जलसाठ्यात दोनपेक्षा जास्त टक्क्यांची वाढ झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंत धरणातील उपयुक्त जलसाठा २७.१६ टक्क्यांवर पोहोचला असून, नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील २४ तासांत आणखी पाणी धरणात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या २४ तासांत नाशिक, मालेगाव आणि परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे गिरणा धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा वेग वाढला असून जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धरणातील उपयुक्त जलसाठा २५.३ टक्के होता. त्यात अवघ्या एका दिवसात वाढ होऊन बुधवारी सकाळी तो २७.१६ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील डोंगरी भागात आणि धरणाच्या मुख्य पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. यामुळे गिरणा धरणात येणाऱ्या पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत धरणाच्या जलसाठ्यात आणखी वाढ होईल, असा आशावाद पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.गिरणा धरणातील वाढता जलसाठा हा जळगाव जिल्ह्यासाठी दिलासादायक मानला जात आहे.
दरम्यान जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे गिरणा धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला होता. अशा परिस्थितीत पाचोरा आणि भडगाव नगर परिषदांसह चाळीसगाव औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्यासाठी धरणातून पाचवे बिगर सिंचन आवर्तन सोडण्याची वेळ आली होती. त्यानुसार १९ जून रोजी सुमारे २ हजार क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले, त्यामुळे धरणातील उपयुक्त जलसाठा २२ टक्क्यांपर्यंत खाली आला होता.मात्र, जुलैच्या सुरुवातीपासून नाशिक जिल्ह्यातील गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने परिस्थितीत सकारात्मक बदल झाला आहे. गिरणा नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात असल्याने तेथील पावसाचा थेट परिणाम धरणातील पाण्याच्या आवकवर होत असतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर