
कोल्हापूर, 08 जुलै (हिं.स.)। पेठ वडगाव, ता. हातकणंगले येथील एसटी स्टँडच्या पाठीमागील कॉम्प्लेक्ससमोर पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करत निर्घृण खून केल्याची थरारक घटना आज बुधवारी (ता. ८) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. पती-पत्नी यांच्यातील वादातून सावर्डे ता. हातकणंगले येथील दीपक लाडू कांबळे (वय ३५) याने मोबाईलवर 'आज माझा तर शेवट, तुझा तर शेवट' असा स्टेटस ठेवून आपल्या अमृता (वय 30) या पत्नी चा निर्घृण खून केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमृता दीपक कांबळे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, संशयित दीपक लाडू कांबळे (वय ३५, रा. सावर्डे) हा घटनेनंतर फरार झाला आहे. दीपक कांबळे व अमृता यांचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. काही दिवसांपासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होता. अमृता या एसटी स्टँडच्या पाठीमागील कॉम्प्लेक्समध्ये एका वकिलाला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्याचवेळी दीपक तेथे आला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने जवळील कोयत्याने अमृता यांच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या अमृता या रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळल्या.
घटनास्थळी उपस्थित काही तरुणांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती माझी पत्नी आहे, तुम्ही यात पडू नका, असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवून त्याने लोकांना हुसकून लावले आणि तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोरख चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. या प्रकरणाची वडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar