
सकाळी पोलिसांच्या वाहनाचे स्टेअरिंग हाती
रात्री अपघातग्रस्तांना मदत हात :
नाशिक, 08 जुलै (हिं.स.)। संकट कोणतेही असो, केवळ प्रशासकीय आदेशांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून मदतीसाठी पुढाकार घेणे, ही आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यशैलीची ओळख मानली जाते. इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा आढावा घेत असताना घडलेल्या दोन घटनांनी त्यांच्या या कार्यपद्धतीची पुन्हा एकदा प्रचिती दिली.
त्र्यंबकेश्वर परिसरात पूरस्थितीची पाहणी सुरू असताना पोलिसांचे वाहन चिखलात अडकले. परिस्थिती लक्षात येताच मंत्री महाजन यांनी कोणताही औपचारिक विचार न करता स्वतः वाहनाचे स्टेअरिंग हाती घेतले. उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या मदतीने वाहन चिखलातून बाहेर काढण्यात आले.
राज्याचे मंत्री असूनही पदाचा औपचारिकपणा बाजूला ठेवत प्रत्यक्ष कृतीत उतरलेली त्यांची ही भूमिका घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिक आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात राहिली. याच दिवशी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पालघर जिल्ह्याचा दौरा आटोपून मुंबईकडे परतत असताना मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील मनोर गावाजवळील उड्डाणपुलावर झालेला अपघात मंत्री महाजन यांच्या निदर्शनास आला. मुसळधार पावसात नालासोपारा येथील पांचाळ कुटुंबाची स्विफ्ट डिझायर कार ट्रकला धडकून ट्रकच्या पुढील भागात अडकली होती. धडकेनंतर कार काही अंतर फरफटत गेल्याने घटनास्थळी वाहतूक विस्कळीत झाली होती. मंत्री महाजन यांनी तातडीने ताफा थांबवून घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये तीन महिला, एक लहान मूल आणि एक पुरुष असे पांचाळ कुटुंबातील सदस्य अडकले होते. त्यांनी पोलिसांना आवश्यक सूचना देत उपस्थित नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने कार सुरक्षितपणे बाहेर काढण्याची व्यवस्था केली.त्यानंतर कुटुंबीयांना जवळच्या पोलीस ठाण्यात सुरक्षित पोहोचविण्यात आले. त्यांच्या मदतीसाठी एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बंद पडलेला ट्रक तातडीने हटविण्याचे निर्देशही देण्यात आले.
चौकट
मदतीला मंत्री स्वतः रस्त्यावर — कुटुंबाची कृतज्ञता
मुसळधार पावसात स्वतः राज्याचे मंत्री मदतीसाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहून पांचाळ कुटुंबाने आश्चर्य व्यक्त करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.गेल्या काही वर्षांत पूर, अतिवृष्टी, भूस्खलन, दुष्काळ किंवा अन्य नैसर्गिक आपत्तींच्या काळात गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. प्रशासनाला दिशा देतानाच गरज भासल्यास स्वतः पुढे होऊन मदतकार्याला गती देण्याची त्यांची कार्यपद्धती अनेकदा दिसून आली आहे.
चौकट
संकटात आदेश नव्हे, प्रत्यक्ष कृतीवर भर
त्र्यंबकेश्वरमध्ये चिखलात अडकलेल्या पोलिस वाहनाचे स्वतः स्टेअरिंग हाती घेतले.
पालघरमध्ये महामार्ग अपघातातील कुटुंबाला तातडीने मदत केली.
पोलिस व प्रशासनाला घटनास्थळी आवश्यक सूचना दिल्या.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV