निलंग्यातील घरफोडी उघड; सराईत आरोपी जेरबंद, १३.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 08 जुलै (हिं.स.)। निलंगा शहरातील घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत एका सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल १३ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत सोन्या-चांदीचे दागिन
पोलीस कारवाई


लातूर, 08 जुलै (हिं.स.)।

निलंगा शहरातील घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत एका सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल १३ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत सोन्या-चांदीचे दागिने, एक लाखांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यातील घरफोडी, चोरी व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम सुरू आहे. त्याच मोहिमेअंतर्गत ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांचे पथक घरफोडीतील आरोपींचा शोध घेत असताना, निलंगा येथील चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने विक्रीसाठी विजय बापू काळे हा शिवली मोड परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.

संशयित आरोपी होंडा युनिकॉर्न मोटारसायकलवर आल्यानंतर पोलिसांची चाहूल लागताच त्याने वाहन टाकून शेतातून पळ काढला. मात्र पोलिसांनी तीन ते चार किलोमीटर पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीने आपले नाव विजय बापू काळे (वय २६, रा. हंगरगा (तुळ), ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे सांगितले. त्याने साथीदार आकाश दंडगुले याच्या मदतीने सुमारे पंधरा दिवसांपूर्वी निलंगा शहरातील बंद घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८५/२०२६ भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल आहे.

आरोपीकडून ७ तोळे ९ ग्रॅम सोन्याचे दागिने, १६ तोळे चांदीचे दागिने, १ लाख रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण १३ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त दागिन्यांमध्ये गंठण, नेकलेस, झुमके, अंगठी, सरपाळे, पदक, पैंजण, जोडवे व कडे यांचा समावेश आहे.

आरोपीला जप्त मुद्देमालासह निलंगा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. फरार साथीदाराच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande