नाशिक - व्हिजिट मलेशिया २०२६ रोडशोला प्रतिसाद
भारतीयांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन मोहिमेला वेग नाशिक, 08 जुलै (हिं.स.)। भारतीय पर्यटकांसाठी मलेशियाला पसंतीचे पर्यटनस्थळ म्हणून अधिक प्रभावीपणे सादर करण्याच्या उद्देशाने टुरिझम मलेशियाने ''व्हिजिट मलेशिया २०२६'' (VM2026) मोहिमेला वेग दिला आहे
Response to the 'Visit Malaysia


भारतीयांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन मोहिमेला वेग

नाशिक, 08 जुलै (हिं.स.)। भारतीय पर्यटकांसाठी मलेशियाला पसंतीचे पर्यटनस्थळ म्हणून अधिक प्रभावीपणे सादर करण्याच्या उद्देशाने टुरिझम मलेशियाने 'व्हिजिट मलेशिया २०२६' (VM2026) मोहिमेला वेग दिला आहे. त्याचाच भाग म्हणून नाशिक आणि संभाजीनगर येथे रोडशोचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील ट्रॅव्हल ट्रेड क्षेत्राशी सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.

टुरिझम मलेशिया मुंबईच्या संचालक हरयांती अबू बकर यांच्या नेतृत्वाखालील ११ सदस्यीय शिष्टमंडळात ट्रॅव्हल एजन्सी, विमान कंपन्या आणि पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या रोडशोद्वारे मलेशियातील निसर्गरम्य पर्यटनस्थळे, सांस्कृतिक वैविध्य, साहसी पर्यटन, कौटुंबिक सहली आणि परवडणाऱ्या पर्यटन पर्यायांची माहिती ट्रॅव्हल ट्रेडला देण्यात येत आहे.

भारत हा मलेशियाच्या प्रमुख पर्यटन स्रोत बाजारपेठांपैकी एक असून, नाशिक आणि संभाजीनगरसारख्या टियर-२ शहरांमध्ये आउटबाउंड पर्यटनासाठी मोठी क्षमता असल्याचे हरयांती अबू बकर यांनी सांगितले. भारतातून मलेशियाला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. २०२५ मध्ये १५ लाख भारतीय पर्यटकांनी मलेशियाला भेट दिली असून, २०२४ च्या तुलनेत ही १४.६ टक्के वाढ आहे. तर २०२६ च्या पहिल्या पाच महिन्यांतच ६ लाखांहून अधिक भारतीय पर्यटकांनी मलेशियाचा प्रवास केला आहे.

भारत आणि मलेशिया यांच्यातील हवाई संपर्कही अधिक सक्षम झाला आहे. भारतातील ११ शहरांमधून आठवड्याला २०० हून अधिक थेट विमानसेवा उपलब्ध असून, मुंबई–क्वालालंपूर मार्गावर दर आठवड्याला १७ थेट उड्डाणे असल्याने महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मलेशियाचा प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे.

'व्हिजिट मलेशिया २०२६' मोहिमेला व्यापक यश मिळावे, तसेच शाश्वत पर्यटनाला चालना मिळावी यासाठी भारतीय ट्रॅव्हल ट्रेड, विमान कंपन्या, प्रसारमाध्यमे आणि अन्य भागधारकांसोबतचे सहकार्य अधिक बळकट करण्याचा निर्धार टुरिझम मलेशियाने व्यक्त केला आहे. मार्केटींग व्यवस्थापक जे ने डिक्रूझ, संचालक हरियांती अबू बखर, तान संस्थेचे सेक्रेटरी अंबरीश मोरे, सागर वाकचौरे, दत्ता भालेराव यांच्यांसह ट्रॅव्हल असोसिएशन चे पदाधिकारी ट्रॅव्हल एजंट आदी उपस्थित होते

चौकट : महाराष्ट्रात पर्यटनासाठी मोठी क्षमता

भारत हा मलेशियाच्या प्रमुख पर्यटन स्रोत बाजारपेठांपैकी एक आहे. महाराष्ट्रात आउटबाउंड पर्यटनासाठी मोठी क्षमता असून, 'व्हिजिट मलेशिया २०२६' रोडशोच्या माध्यमातून नाशिक आणि संभाजीनगरमधील ट्रॅव्हल ट्रेड समुदायासोबतची भागीदारी अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मलेशियातील विविध पर्यटनस्थळे, सांस्कृतिक वैविध्य, साहसी आणि कौटुंबिक पर्यटन तसेच परवडणाऱ्या पर्यटन सेवांची माहिती अधिकाधिक भारतीय पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

— हरयांती अबू बकर

संचालक, टुरिझम मलेशिया, मुंबई

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande