
रत्नागिरी, 8 जुलै (हिं.स.) । कोळंबे (ता. संगमेश्वर) येथील कमळजाबाई हायस्कूलच्या मागील दरड कोसळली असून, शाळेतील ४०० विद्यार्थ्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदाराने शाळेच्या जवळपासची खोदाई केल्यामुळे तेथील झाडे कोणत्याक्षणी इमारतीवर कोसळण्याचे शक्यता आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शाळा दरडीच्या तडाख्यात सापडल्याचा इशारा वारंवार देऊनही, प्रशासनाने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले. अखेर आज दरड कोसळल्याने हा विषय अधिक गंभीर झाला आहे. प्रशासनाने कोळंबे हायस्कूलला नोटीस जारी केली आहे. त्यामध्ये मुलींचे स्वच्छतागृह बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पर्यायी जागा उपलब्ध नाही. शाळेत सुमारे १५० मुली आहेत. त्यांची गैरसोय होणार आहे. शाळेलाही धोका निर्माण झाला आहे.
दरडीचा आणखी मोठा भाग कोसळला, तर संपूर्ण शाळा इमारत गाडली जाण्याचा धोका आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी