
नवी दिल्ली, 08 जुलै (हिं.स.)। पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात निर्माण झालेल्या भीतीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपल्याची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आणि बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा झाला. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाले.
बुधवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवातच कमजोरीने झाली होती. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे सुरुवातीपासूनच विक्रीचा दबाव कायम राहिला. दुपारच्या सुमारास पश्चिम आशियातील परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता वाढल्याने बाजारात मोठी घसरण झाली. दिवसभराच्या व्यवहारानंतर बीएसई सेन्सेक्स १,६७७.१२ अंकांच्या घसरणीसह ७६,५०३.६० अंकांवर बंद झाला. तर एनएसई निफ्टी ५१६.६५ अंकांनी घसरून २३,८८२.०५ अंकांच्या पातळीवर स्थिरावला.
आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी घट झाली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ८.२४ लाख कोटी रुपयांनी कमी झाले. मंगळवारी बाजार भांडवल ४७९.६८ लाख कोटी रुपये होते, जे बुधवारी घसरून ४७१.४४ लाख कोटी रुपयांवर आले.
आज सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले. बँकिंग क्षेत्रातील शेअर्सवर मोठा दबाव दिसून आला. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक २.५६ टक्के तर निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांक २.४२ टक्क्यांनी घसरला. याशिवाय ऑटोमोबाईल, पायाभूत सुविधा, तेल आणि वायू, माहिती तंत्रज्ञान, कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि धातू क्षेत्रातील शेअर्समध्येही विक्री झाली.
व्यापक बाजारातही मोठी घसरण पाहायला मिळाली. निफ्टी मिडकॅप निर्देशांक १.५५ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप निर्देशांक २.२४ टक्क्यांनी घसरला. बीएसईवर व्यवहार झालेल्या ४,४५४ शेअर्सपैकी ३,२११ शेअर्स घसरणीसह बंद झाले, तर केवळ १,०७० शेअर्समध्ये वाढ झाली.
सेन्सेक्समधील सर्व ३० शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीतील ५० पैकी केवळ चार शेअर्स वाढले. यामध्ये ओएनजीसी, बजाज ऑटो, हिंडाल्को आणि कोल इंडिया या कंपन्यांचा समावेश होता. दुसरीकडे जिओ फायनान्शियल, इंटरग्लोब एव्हिएशन, श्रीराम फायनान्स, मारुती सुझुकी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे मोठ्या घसरणीचे प्रमुख शेअर्स ठरले. जागतिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावामुळे पुढील काही दिवस बाजारातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule