
- पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी
कोल्हापूर, 08 जुलै (हिं.स.)जिल्हयातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सर्वागीण प्रगती साठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संघाची सुरु असलेली बदनामी त्वरित थांबवावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. युवराज येडुरे यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ शिरगाव येथील गोकुळ चौकात भर पावसात आत्मक्लेश आंदोलन झाले. यामध्ये पंचक्रोशीतील शेतकरी, कष्टकरी आणि महिलांचा उस्फूर्त सहभाग हा सर्वांसाठी लक्षवेधी ठरला .
या आंदोलन विषयी आपली भूमिका विशद करताना डॉ. युवराज येडुरे म्हणाले की ' लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली. माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली.
म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे.
परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे भविष्यातील होऊ नये यासाठी सत्ताधारी विरोधकांनी खबरदारी घ्यावी यासाठीच आपण हे आंदोलन करत असो यास मिळालेला हा प्रतिसाद सर्वांनाच एक चपराक आहे असे परखड मत त्यांनी नोंदवले . या आंदोलनात भुदरगड, कागल, राधानगरी परिसरातील धारवाड, मसवे, सावर्डे, पांढरपाणी, हमीदवाडा, मोरेवाडी, वाघापूर, गोडशी, ईस्पुली, चक्रेश्वरवाडी, नांदवली, सांगाव, भुदरगड, सह पंचक्रोशीतील शेतकरी महिला तसेच विविध सहकारी दूध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते . सायंकाळी या आंदोलनाची दूध पिऊन सांगता करण्यात आली. यानंतर गोकुळ मुख्यालयात आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व्यापक शिष्टमंडळाद्वारे आपले मागणीचे निवेदन प्रदीप मालगावे योगेश गोडसे, सागर बलकवडे यांना संयुक्तपणे सादर केले . आगामी पंधरा दिवसात आपल्या मागण्यावर सकारात्मक कारवाई न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करून असेही युवराज येडुरे यांनी सांगितले . आपल्या मागणी निवेदनात त्यांनी गोकुळचे प्रचार दरम्यान विनाकारण बदनामी करणाऱ्या विरोधकांनी सत्ताधारी यांच्यावर परत कायदेशीर कारवाई करावी. ठराव आणि त्यासाठी दबाव तंत्र आणि कोट्यावधीचा होत असलेला व्यवहार याविषयी कारवाई करावी. गोकुळची स्वायत्तता पारदर्शकता आणि शेतकरी केंद्रित कार्यपद्धती आबाधीत राहण्यासाठी शासनाने स्वतंत्र संरक्षणात्मक धोरण करावे आणि आगामी निवडणुकीत सर्व सभासदांना थेट मतदानाचा अधिकार मिळावा. यासह विविध मागणीचे निवेदन सादर केले . भर पावसात झालेले आंदोलन आगामी गोकुळच्या प्रचाराच्या आणि आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्याच केंद्रस्थानी राहणार आहे .
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar