
रत्नागिरी, 8 जुलै (हिं.स.) । भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत चिपळूण तालुक्यातील टेरव बुद्रुक या गावाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आपले काम १०० टक्के पूर्ण केले आहे. हा बहुमान मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे.
या मोहिमेत ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांनी (BLO) घरोघरी भेटी देऊन हे पुनरिक्षण काम अत्यंत अचूकतेने पूर्ण केले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष मोहिमेसाठी टेरव बुद्रुक गावाची निवड करण्यात आली होती. चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे आणि निवडणूक नायब तहसीलदार रसिका रसाळ यांनी या संपूर्ण कामावर देखरेख ठेवली.
या गावामध्ये एकूण १९५ मतदार असून, त्यामध्ये ९३ महिला आणि १०२ पुरुष मतदारांचा समावेश आहे. मोहिमेदरम्यान गावातील सर्वच्या सर्व १९५ मतदारांना गणना प्रपत्राचे वाटप करण्यात आले होते. यापैकी १८७ मतदारांचे गणना प्रपत्र ॲपद्वारे यशस्वीरीत्या डिजिटायझेशन करून ऑनलाइन नोंदवण्यात आले.
या विशेष मोहिमेत तांत्रिक अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी जमा न होण्याजोग्या ८ प्रपत्रांचे वर्गीकरण अत्यंत सखोलपणे करण्यात आले. यामध्ये गावातून २ मयत मतदार, ५ दुबार नोंदणी असणारे मतदार आणि १ कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदाराची अचूक माहिती समोर आली असून, त्यानुसार कायदेशीर प्रक्रियेद्वारे मतदार यादी संपूर्णपणे निर्दोष व अद्ययावत करण्यात आली आहे.
या ऐतिहासिक कामगिरीत बीएलओ सुप्रिया लोखंडे, पर्यवेक्षक आस्माकौसर राजअहमद देसाई), अधिकारी नारायण चौधर, अंगणवाडी सेविका मधुरा विश्वनाथ साळवी, तसेच सुहास मोहिते (पोलीस पाटील), शुभम उतेकर (ग्राम महसूल अधिकारी), अनिकेत शिर्के (महसूल सहाय्यक - निवडणूक शाखा) आणि ग्रामपंचायतीच्या संपूर्ण पथकाने अहोरात्र मेहनत घेतली. या अभूतपूर्व यशाबद्दल जिल्हा प्रशासनाकडून टेरव बुद्रुक गावाचे आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे विशेष कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी