
नाशिक, 08 जुलै (हिं.स.)।
प्रभू श्रीरामांच्या पावन नगरी अयोध्येत महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा गौरव करणारा सोहळा पार पडला. अयोध्येतील समस्त संत-महंतांच्या वतीने जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना ‘विश्व शांती भक्ती सेवा रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
अयोध्येतील संत समाजाने प्रसिद्ध केलेल्या गौरवपत्रात नमूद करण्यात आले आहे की, निष्काम कर्मयोगी, शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या परंपरेचा वारसा समर्थपणे पुढे नेत असलेल्या जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी धर्म, अध्यात्म, सनातन संस्कृती आणि भारतीय संस्कारांच्या प्रचार-प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. भक्तांमध्ये धर्मसाधना, सेवा आणि समर्पणाची भावना जागृत करण्यासाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे गौरवपत्रात म्हटले आहे.
यावेळी अयोध्येतील संत समाजाने जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या उज्ज्वल कार्याला नमन करत त्यांच्या पुढील धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी श्रीरामचंद्रांच्या कृपाशीर्वादाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना धर्मगंगा अखंडीत प्रवाहित ठेवण्याचे बळ लाभो, अशी प्रार्थनाही संत समाजाने व्यक्त केली.
या सन्मानामुळे महाराष्ट्रासह अयोध्येतील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या धर्मप्रसाराच्या कार्याला मिळालेली ही आणखी एक महत्त्वाची राष्ट्रीय स्तरावरील गौरवाची नोंद मानली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV