
रायगड, 08 जुलै (हिं.स.)। मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील रावे आणि तांबडशेत गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असताना नऊ महिन्यांच्या दोन गर्भवती महिलांची अत्यंत धाडसी पद्धतीने सुटका करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या तत्पर नियोजनामुळे आणि 'आपदा मित्र' अभिकेत म्हात्रे व राजेश म्हात्रे यांच्या साहसी बचाव मोहिमेमुळे दोन मातांसह त्यांच्या गर्भातील दोन बाळांचेही प्राण वाचले.
रावे येथील पायल राजेश पाटील (वय २३) यांना प्रसूतीसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद आरोग्य समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश शिर्के यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या निर्देशानुसार तात्काळ बचाव पथक रवाना करण्यात आले.
पुराच्या पाण्याचा वेग प्रचंड असल्याने मासेमारीच्या बोटी वापरणे शक्य नव्हते. त्यामुळे शासनाच्या रबर बोटीच्या सहाय्याने बचाव मोहीम राबविण्यात आली. जीवाची पर्वा न करता आपदा मित्र अभिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांनी पुराच्या प्रवाहातून गावात प्रवेश करून पायल पाटील यांच्यासह अन्य चार जणांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर सज्ज ठेवलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांना पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पहिली मोहीम पूर्ण होताच तांबडशेत गावातील आणखी एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेबाबत माहिती मिळाली. त्याच पथकाने पुन्हा जीव धोक्यात घालून दुसरी बचाव मोहीम राबवली आणि त्या महिलेलाही सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवले.
या धाडसी मोहिमेमुळे दोन मातांसह त्यांच्या गर्भातील दोन बाळांचे प्राण वाचले. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि 'आपदा मित्र' यांच्या समन्वयाचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले असून, या कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)