
रायगड, 08 जुलै (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील खानाव येथील पुलावरील भगदाडात पडून ६५ वर्षीय चांगू घरत यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी मृताच्या कुटुंबाला १५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर होईपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यास ठाम विरोध केला. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर प्रशासनाला माघार घ्यावी लागली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने १५ लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले.
चांगू घरत यांचा पुलावरील भगदाडात पडून मृत्यू झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. योग्य भरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नसल्याची भूमिका घेतल्याने पोलीस, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यांनी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधून मृताच्या कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी केली. उपसरपंच निलेश गायकर आणि ग्रामस्थांनीही ही मागणी लावून धरली.
अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता दिनेश पराते यांनी महसूल विभागाच्या समन्वयाने मृताच्या नातेवाईकांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यास संमती दिली.
या घटनेमुळे परिसरात सुमारे चार ते पाच तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने पुलावरील भगदाडाची तातडीने दुरुस्ती करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)