
पुणे, 08 जुलै (हिं.स.)। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी पुणे शहरात दाखल होत असून, या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. यंदा प्रथमच पालखी मार्गावर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे, फेस रेकग्निशन कॅमेरे आणि अॅडव्हान्स व्हिडिओ अॅनालिटिक्स प्रणाली तैनात करण्यात येणार असून, संपूर्ण सोहळ्यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नजर ठेवली जाणार आहे.
या सोहळ्यासाठी सुमारे ७ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे, संजय पाटील आणि तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, पालखी मार्ग तसेच मुक्कामाच्या ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ते थेट पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पालखी सोहळ्यातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाणार असून, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा प्रभावी वापर केला जाणार आहे.
यंदाच्या पालखी सोहळ्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षा व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, वारकरी आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु