१६ ते २० जुलैदरम्यान १० मानाच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार
सोलापूर, 08 जुलै, (हिं.स.)। आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ रोजी साजरी होत असून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या महाराष्ट्रातील १० मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यातील आगमन वेळापत्रक जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. या सर्व पालख्या १६ ते २० जुलै या कालाव
wari


सोलापूर, 08 जुलै, (हिं.स.)। आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ रोजी साजरी होत असून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या महाराष्ट्रातील १० मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यातील आगमन वेळापत्रक जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. या सर्व पालख्या १६ ते २० जुलै या कालावधीत सोलापूर जिल्हा हद्दीत दाखल होणार असून त्यांच्या स्वागतासाठी तसेच वारकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नोडल व सहाय्यक समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर येथील पालखी १६ जुलै रोजी सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यानंतर १७ जुलै रोजी श्री संत गजानन महाराज, शेगाव पालखी, १८ जुलै रोजी श्री संत निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर पालखी जिल्हा हद्दीत प्रवेश करणार आहे.

१९ जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), श्री संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), श्री संत एकनाथ महाराज आणि श्री संत निळोबाराय महाराज (पिंपळनेर) अशा चार प्रमुख पालख्या जिल्ह्यात दाखल होणार आहेत. तर २० जुलै रोजी श्री संत तुकाराम महाराज (देहू), श्री संत सोपान महाराज (सासवड) आणि श्री संत चांगावटेश्वर देवस्थान (सासवड) यांच्या पालख्यांचे आगमन होणार आहे.

वारकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने प्रत्येक पालखीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी आणि सहाय्यक समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पालख्यांच्या स्वागतापासून ते मुक्काम आणि पुढील मार्गक्रमणापर्यंत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वारकरी आणि नागरिकांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाल्यास संबंधित नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (०२१७-२७३१०१०) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande